सांगली : सांगली जिल्हातील कडेगाव तालुक्यात वाळू तस्करीवर जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार कालम-पाटील आणि निवासी जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी अचानकपणे कडेगाव तालुक्यात छापेमारी केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

कडेगावमधील येरळा नदीतून होणारा बेसुमार वाळू उपसा उजेडात आणत काल पहाटेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी 150 ब्रास वाळू जप्त केली. शिवाय या नदीतून 2 हजार 500 ब्रासहून अधिक वाळू उपसा झाल्याचा आरोप करत या तस्करावर तब्बल 11 कोटी रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

ही जिल्हातील वाळू माफियांवरील सर्वात मोठी कारवाई मानली जाते आहे. या कारवाईमध्ये आतपर्यत एकूण 14 लाखाची वाळू जप्त केली असून 5 ट्रॅक्टर आणि 3 दुचाकी वाहने जप्त केली आहेत. त्याचसोबत 25 ट्रॅक्टर आणि 2 जेसीबी जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

वाळूमाफियाला कुणाचंही पाठबळ असलं, तरी कारवाई केली जाईलच, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाळू तस्करी पूर्णपणे बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी विडा उचलला आहे.