सांगली : आपल्या व्यवसायात कोण काय शक्कल लढवेल याचा नेम नसतो. अशीच एक शक्कल लढवलीय ती सांगलीतील Ustra मेन्स स्टुडिओचा मालक रामचंद दत्तात्रय काशीदने. ज्या हत्यारावर काशीदचा व्यवसाय चालतो, त्या हत्यारालाच त्याने सोन्याची झळाळी दिली आहे.
या पठ्ठ्याने तीन लाख रुपये खर्च करुन 18 कॅरेटचा आणि साडे दहा तोळ्याचा सोन्याचा वस्तराच बनवला आहे. आता या वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी त्याच्याकडे रांग लागली आहे.
रामचंद यांचे वडील दत्तात्रय काशीद यांच्या लग्नाच्या 33व्या वाढदिवसाला त्यांची सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करुन श्रीगणेशा केला.
बरं हा सोन्याचा वस्तरा बनवून देण्यासाठी कोणताही सराफ तयार होत नव्हता. पण सांगलीतील चंदूकाका सराफमधील मॅनेजर महावीर पाटील यांनी हा सोन्याचा वस्तरा बनवण्याचं आव्हान स्वीकारलं. पुण्यातील मिथुन राणा या कारागिराच्या मदतीने मोठ्या कष्टाने 20 दिवसात सेम टू सेम पण साडे दहा तोळ्याचा सोन्याचा वस्तरा अखेर तयार झाला.
या सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करायचे दर जास्त जरी असले तरी वर्षातून एकदा का होईना, त्याने दाढी करायची हौस प्रत्येकजण भागवेल, एवढं मात्र नक्की. त्यामुळे ‘इथे सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करुन मिळेल,’ असा बोर्ड झळकला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
साडे दहा तोळ्याच्या सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करणारा सलूनवाला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 May 2018 03:13 PM (IST)
या सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करायचे दर जास्त जरी असले तरी वर्षातून एकदा का होईना, त्याने दाढी करायची हौस प्रत्येकजण भागवेल, एवढं मात्र नक्की.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -