एका झोपडीत 3 कोटी सापडल्यानं मैनुद्दीनला पोलिसांनी अटक केली होती. मात्र 20 दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर मैनुद्दीनं त्याचा साथीदार विनायक जाधव याच्याकडे ठेवलेले 70 लाख रुपये घेतले आणि तो पसार झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विनायक जाधव आणि मैनुद्दीनच्या पत्नीला अटक केली आहे.
झोपडपट्टीत 3 कोटी
काही दिवसांपूर्वी मिरजमधील मासेविक्रेता मैनुद्दीन मुल्लाच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. या छाप्यात तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम पोलिसांना सापडली होती.
मात्र, मैनुद्दीनकडे इतकी रक्कम कुठून आली, याचं कोडं सर्वाना पडलं होतं. पोलिस चौकशीतही मैनुद्दीनने खोटी माहिती दिली होती. ही रक्कम कर्नाटकातील एका खासदाराच्या गाडीतून चोरली असल्याचं सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता, मैनुद्दीनने हे पैसे कोल्हापूरच्या वारणानगरमधील बिल्डर झुंजार सरनोबत यांचे चोरल्याचं समोर आलं होतं.
काय होतं हे प्रकरण? मैनुद्दीन मुल्लाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे?
सांगलीतल्या बैथलेहेम नगरात घबाड मिळालं. लाख दोन लाखांचं नाही, तर तब्बल 3 कोटींचं आणि तेही झोपडीतून.
मैनुद्दीन मुल्ला, चाळीशीतला इसम, ज्याचे खाण्याचे वांदे होते, तो अचानक बुलेट घेऊन फिरु लागला, पण हीच चंगळ त्याच्या अंगलट आली.
गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आला, त्यांनी चौकशी केली असता मैनुद्दीनकडून दीड लाख हस्तगत केले. अधिक चौकशी करताना त्याच्या घरात 3 कोटी असल्याचं समोर आलं.
मग काय… सांगली पोलिसांची फौज त्याच्या घरात दाखल झाली आणि घरातला खजाना पाहून सगळ्यांचेच डोळे भिरभिरले. पाहावं तिकडे पैसे, बॉक्समध्ये पैसे, गादीखाली पैसे, पैसेच पैसे, नोटा मोजून मोजून बँकवालेही घामाघूम.
पण मैनुद्दीन नक्की कोण आहे? याचा तपास घेताना त्याच्या मूळ गावाचा शोध लागला. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातल्या जाखल्याशी त्याचं नातं आहे. ख्रिश्चन मुलीशी लग्न केल्यानंतर 20 वर्षांपूर्वी जो तो गायब झाला, तो दिसलाच नाही.
मैनुद्दीनच्या या अकल्पित खजान्यानं गावकऱ्यांचेही डोळे विस्फारले. मैनुद्दीनची परिस्थिती अत्यंत बिकट होती, त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला.