इस्लामपूर : कोरोनाच्या जागतिक महामारीत देश होरपळून निघत आहे. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. देशात दैनंदिन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. परंतु, दररोज समोर येणार मृत्यूचा आकडा चिंता वाढवणारा आहे. लाखो लोकांचे जीव कोरोनाची लागण झाल्यामुळे झाले आहेत. तसेच अनेकांचे मृत्यू हे फक्त कोरोनाच्या भीतीपोटी होत आहेत. मात्र या परिस्थितीत देखील काही लोक आहेत ज्यांनी कोरोनावर मोठ्या धाडसाने आणि हिमतीने मात केली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सध्याचं एकमेव अस्त्र म्हणजे, कोरोनाची लस. सांगलीतील इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील 108 वर्षीय जरीना अब्दुल शेख या आजींनी कोरोनाला आपल्या जवळपास तर फिरकू दिलेच नाही, न घाबरता लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून जिद्दीने लढण्याचा एक संदेशही सर्वांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री यांनी आज दोन्ही डोस पूर्ण केल्याबद्दल 108 वर्षीय जरीना अब्दुल शेख यांचा साडी चोळी देऊन सत्कार केला. इस्लामपूर येथील जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते, हे आज जरीना आजीने दाखवून दिलं. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लसी घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावं, असं आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केलं आहे.
सध्या देशासह राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नकारात्मक वातावरण पसरलं आहे. अशातच सांगलीतील इस्लामपूरमधील जरीना आजींनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करुन सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. अनेकजण लस घेणं टाळतात. परंतु, लस सुरक्षित आहे. ती घेणं आवश्यक आहे. सर्वांचं लसीकरण केल्यामुळेच कोरोना विरुद्धची लढाई आणखी सोपी होणार आहे.
महाराष्ट्रात कोरोनामुळं एकूण मृत्यूचा आकडा एक लाख पार
देशात कोरोना महामारीनं (Corona in India) कहर केला आहे. त्यात सर्वाधिक प्रकोप झाला तो महाराष्ट्रात. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना (Maharashtra Corona Cases) रुग्णसंख्येसह सर्वात जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात कोरोनामुळं गेलेल्या बळींची (Maharashtra Corona Death) संख्या लाखाच्या वर गेली आहे. आता जरी कोरोनाचे आकडे कमी येत असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात 100130 लोकांचा जीव गेला आहे. देशात आजपर्यंत साडेतीन लाखांच्या जवळपास मृत्यू नोंदवले गेले आहेत. याचा अर्थ कोरोनामुळं दगावलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती हा महाराष्ट्रातील आहे. दुसऱ्या क्रमांकांवर कर्नाटक आहे. कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रात 70 हजार अधिक मृत्यू झाले आहेत.