बीड : विधानसभेचा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसा राजकीय विरोधकांमधील संघर्षसुद्धा वाढताना पाहायला मिळतोय. बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभा राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्षसुद्धा गल्लोगल्ली पाहायला मिळत आहे. राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी सवाल उपस्थित केला आहे, तोही थेट बॅनरबाजी करून.
बीड शहरामध्ये जागोजागी संदीप क्षीरसागर यांनी बॅनर्स लावले असून त्या बॅनरवर जयदत्त क्षीरसागर आणि बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत.
विकासाच्या नावाखाली जनतेला सातत्याने त्रास दिला असून कोट्यवधी रुपयांची बोगस कामे केल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. बीड शहरातील अनेक मोक्याच्या ठिकाणी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या विकासकामांची पोलखोल करणारे अनेक बॅनर पाहायला मिळत आहेत.
काय आहेत पुतण्याचे काकावर आरोप?
20-20 दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे. अंत्यविधीसाठी पाणी देतानासुध्दा राजकारणच करणार का?
नगरोत्थान योजनेतील 165 कोटी खर्च झाले, त्यानंतर त्याने पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आणखी 10 कोटी खर्च केले. पण बीड शहरात गल्लोगल्यांमध्ये खड्डेच खड्डे आहेत. खड्डे बुजविण्याचे दहा कोटी गेले कुठे?
साठ लाखांच्या सिग्नलला 29 लाख रुपये दुरूस्तीसाठी मंजूर झाले होते. परंतू शहरातील एकही सिग्नल सुरु नाही.
सुभाष रोडची साडेसहा कोटी रुपये खर्च करुन पेव्हर ब्लॉकने डागडुजी केली. परंतु त्यावरुन पडून अनेक लोकांची हाडे मोडल्याच्या घटना बीडकरांनी पाहिल्या आहेत.
वाजत-गाजत पक्षश्रेष्ठींसमोर तीन-तीन वेळा उद्घाटन केलेल्या बसस्टँडची अवस्था सांगण्यासारखी नाही. पावसात बस स्टँडमध्ये साठलेले डबके त्याची साक्ष देत आहे.
बीड नगरपालिका ही मागील वीस वर्षांपासून भारतभूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. याच नगरपालिकेच्या निवडणुकीवरून क्षीरसागर कुटुंबांमध्ये फूट पडली आणि काका-पुतणे आमने-सामने उभे राहिले. जाहीर कार्यक्रमातून यापूर्वी संदीप क्षीरसागर यांनी भारतभूषण क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत, मात्र आता बॅनर लावून आरोप झाल्याने याला जयदत्त क्षीरसागर कसे उत्तर देतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काकांच्या कारभारावर पुतण्याची बॅनरबाजीतून टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2019 09:05 PM (IST)
विधानसभेचा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसा राजकीय विरोधकांमधील संघर्षसुद्धा वाढताना पाहायला मिळतोय. बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभा राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्षसुद्धा गल्लोगल्ली पाहायला मिळतोय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -