जळगावमध्ये रेतीच्या डंपरखाली आल्यानं चिमुरड्याचा जागीच मृत्यू, चालक फरार
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 19 Apr 2017 05:18 PM (IST)
जळगाव : जळगावमध्ये रेतीच्या डंपरखाली चिरडून तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. दक्ष भदाणे असं या चिमुकल्याचं नाव आहे. अपघातानंतर स्थानिकांनी डंपर पेटवून दिला. आज बुधवारी सकाळी 7 वाजका भरधाव वेगातील रेतीच्या डंपरनं चिमुरड्याला चिरडलं. जळगाव तालुक्यातील निमखेडी रोडवर कल्याणी नगर जवळ ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावानं रेतीचा डंपर पेटवून दिला. पोलीस आणि अग्नीशमन दलानं घटनास्थळी दाखल होत डंपरच्या आगीवर नियंत्रण मिळवलं. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. पोलिसांनी चालकाचा शोध सुरु केला आहे.