लातूर : गेल्या काही दिवसांमध्ये कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाचे मूक मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चांमध्ये मराठा समाजातील तरुणींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. एबीपी माझाच्या 'संवादयात्रा' कार्यक्रमातून या तरुणींना मराठा मोर्चांबद्दल काय वाटतं?, याबद्दलची मतं जाणून घेण्यात आली.

लातूर शहरात झालेल्या या संवादयात्रेत तरुणींनी कोपर्डीतील बलात्कार पीडित मुलीबद्दल सहानुभूती व्यक्त केली. तसंच मराठा समाजाला एकत्र येण्यासाठी बलात्कारासारखी घटना कारणीभूत ठरते ही बाब दुर्दैवाची असल्याचंही म्हटलं आहे. मुलींना आरक्षणापेक्षा संरक्षण जास्त गरजेचं असल्याची भावना तरुणींनी व्यक्त केली.

आजच्या महिलांनी काचेचं भांडं न राहता बुलेटप्रूफ काच होणं गरजेच असल्याचं एका तरुणीने सांगितलं. इतरांच्या मदतीची अपेक्षा न करता स्वत:च कणखर होण्याची आवश्यकता यावेळी तरुणींनी व्यक्त केली. तसंच इस्लामिक राष्ट्राप्रमाणेच बलात्कार करणाऱ्यांना दगडाने ठेचलं पाहिजे, अशा तीव्र भावनाही तरुणींनी मांडल्या.

कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेनंतर अनेक मुलींचं शिक्षण बंद झालं आहे, तसंच त्यांचं लग्नही लावून देण्यात आलं, हे वास्तव तरुणींनी संवादयात्रेदरम्यान सांगितलं. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी बलात्कारी सरदाराचे हात-पाय तोडण्याची शिक्षा दिली होती, पण वयाने आणि अनुभवाने मोठे असलेले न्यायाधीश अशाप्रकारे निर्णय का देऊ शकत नाहीत, असा सवालही यावेळी विचारण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण नसल्याने खाजगी संस्थांमध्ये शिक्षण घ्यावं लागतं. मराठा समाजाला आरक्षण नाही आणि संरक्षणही नसल्याची खंतही यावेळी मराठा तरुणींनी व्यक्त केली. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी मुलींना कराटे सारख्या साहसी खेळांचं प्रशिक्षण शाळेतच दिलं पाहिजे. तसा अभ्यासक्रम तयार करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली.

बहुसंख्य शेतकरी समाज मराठा समाजातील आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न महत्वाचा आहे. शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या कार्यक्रमात करण्यात आली. राजकारण्यांनी राजकारण दूर ठेवून मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा आणि मागासलेल्या मराठा समाजाला न्याय द्यावा, अशाप्रकारचा सूरही यावेळी उपस्थित तरुणींनी लावला.

पाहा व्हिडीओ :