मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असताना आता खासदार संभाजीराजे छत्रपती हे उदयनराजेंच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहेत. उदयनराजेंच्या प्रत्येक अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे त्यांच्या सोबत असल्याचे संभाजीराजेंनी फेसबुकवरील पोस्टमधून सांगितले.

संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट

याआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनीही उदयनराजेंचं समर्थन केले होते.



काय आहे प्रकरण?

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे.

उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्जकेला होता. पण हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता उदयनराजे स्वत: पोलीस ठाण्यात हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले. पदयात्रेदरम्यान आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे भोसले यांचीही धावती भेट घेत विचारपूस केली. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सध्या चर्चेला उधाण आलं आहे.