मुंबई : मराठा आरक्षणासाठी काल कोल्हापुरात पाहिलं मूक आंदोलन झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीला संभाजीराजे यांच्याबरोबर राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत. 


आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीबाबत सरकार सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे चर्चा देखील सकारात्मक होईल अशी आशा आहे. जर चर्चा नकारात्मक झाली तर पुढे काय होईल हे मी सांगायला नको असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले


संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "सरकार सध्या तरी सकारात्मक दिसत आहेत. मराठा समाजाच्या मागण्या सरकार समोर ठेवल्या आहेत. पुन्हा नव्याने काही सांगायची गरज नाही. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही ठेवलेल्या मागण्या मान्य करुन सरकारने मराठा समाजातील तरुणांना दिलासा द्यावा."


36 जिल्ह्यात आंदोलन करायची इच्छा नाही
कोल्हापुरात ज्या पद्धतीने मूक आंदोलन झालं तशाच पद्धतीने राज्यात सर्व ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक, अमरावती, औरंगाबाद, रायगड याठिकाणी मूक आंदोलन होणार आहे. मात्र आज मागण्या मान्य केल्या तर आम्हाला आंदोलन करण्याऐवजी आनंदोत्सव साजरा देखील करु असही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 


आज होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अशोक चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहेत. आज पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी संभाजीराजे कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच राज्यभरातील समन्वयक आज मुंबईत दाखल झाले आहेत.


कोल्हापूरमध्ये काल राजर्षी  शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, विविध पक्षांचे आमदार, खासदार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन पार पडलं. या आंदोलनामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे सर्व कुटुंबीय देखील उपस्थित होते.


महत्वाच्या बातम्या :