Parivartan Kranti By Sambhaji Raje Chhatrapati : राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार आहेत. येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं (Kranti Din) निमित्त साधून या क्रांतीला सुरुवात होणार आहे. संभाजीराजेंनी आज (3 ऑगस्ट) याबाबत ट्वीट करुन माहिती दिली.
"क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात... भेटूया 9 ऑगस्ट रोजी तुळजापूरला..." असं ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
संभाजीराजेंना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारल्याने वाद
संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात तुळजापूरमधून करण्याला कारण आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आलं होतं. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत आहेत. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर इथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचं ट्वीट केल्याने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
स्वराज्य संघटना तुळजापूरमध्ये काय करणार?
राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी 12 मे रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं सांगितलं. सोबतच स्वराज्य या संघटनेची स्थापना करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असंही संभाजीराजे म्हणाले होते. त्यामुळे संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर इथे नेमकं काय केलं जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.