अन्यथा ठाकरे सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही : संभाजी ब्रिगेड
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2019 05:44 PM (IST)
सिनेमातील एका गाण्यात अभिनेत्याने संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चप्पल घालून पुष्पहार घातल्याचे चित्रित झाले आहे. हा महापुरुषांचा अपमान आहे. हे दृश्य सिनेमातून काढा, अन्यथा सिनेमा महाराष्ट्रात कोठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या सिनेमाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. या सिनेमातील एका गाण्यात अभिनेत्याने संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चप्पल घालून पुष्पहार घातल्याचे चित्रित झाले आहे. हा महापुरुषांचा अपमान आहे. हे दृश्य सिनेमातून काढा, अन्यथा सिनेमा महाराष्ट्रात कोठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. ठाकरे हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चप्पल घालून पुष्पहार घातल्याचं चित्रित झाले आहे. या दृष्यावर संभाजी ब्रिगेडने अक्षेप घेतला आहे. यापूर्वीही सिनेमातील संवादांवर अक्षेप घेण्यात आला होता, मात्र सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानंतर निर्मात्यांनी संवाद कापले होते. या गाण्यातील अक्षेपार्ह दृष्य हटवण्यात आले नाही तर सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी दिला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. या सिनेमात संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही, असं कपिल ढोके म्हणाले. या सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी साकारत आहे. तर अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाची निर्मीती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.