सांगली : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील वक्तव्यावर संभाजी भिडेंनी आक्षेप घेतला आहे. नरेंद्र मोदी चुकीचं बोलले असल्याचंही भिडेंनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संयुक्त राष्ट्रसंघातील वक्तव्यावर बोलतांना संभाजी भिडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करु शकतो, ते काम आपलं आहे. देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध काहीच उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत, असं संभाजी भिडेंनी म्हटलं.
नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये संभाजी भिडे सहभागी झाले होते. तरुणांमध्ये हिंदू धर्माविषयी जागृती व्हावी यासाठी 1982 साली संभाजी भिडेंनी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौड सुरु केली.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानचं नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला होता. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला. भारत जगभरात नेहमीच एकजुटीचा आणि शांतीचा संदेश देत आला आहे. यावेळी मोदींनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि कवी कणियन पूंगुन्ड्रनार यांच्या विचारांचा उल्लेख आवर्जुन केला.
संबंधित बातम्या