रायगड :  किल्ले रायगडावरील राजदरबारात 32 मण सोन्याचं सिंहासन बसविण्याचा संकल्प येत्या 4 जून रोजी करणार, असल्याची घोषणा श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांनी केली. रायगड जिल्ह्यातील महाड येथील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.


श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महाड येथील विरेश्वर मंदिर येथे संभाजी भिडे गुरुजी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं . यावेळी रायगड जिल्ह्यातून चार ते पाच तालुक्यातून धारकरी उपस्थित होते.

यावेळेस बोलताना संभाजी भिडे गुरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जीवनमानाचे वर्णन केले. तसेच राजदरबारात 32 मण सोन्याचं सिंहासन पुनर्स्थापित करण्यास असल्याचं यावेळी सांगितलं. भिडे गुरुजी म्हणाले की, “येत्या 4 जून रोजी किल्ले रायगडावर नवा संकल्प करण्यात येणार आहे. यामध्ये 32 मण सोन्याच्या सिंहसनाची पुनर्स्थापना करायची आहे. हा संकल्प कुणा एका व्यक्तीचा नसून, हिंदवी स्वराज्याचं सिंहासन पुनर्स्थापित करण्याचा संकल्प आहे.’’

या संकल्प कार्यक्रमाबद्दल अधिक सांगताना भिडे गुरुजी म्हणाले की,  "या संकल्पासाठी 3 जून रोजी देशभरातून किमान 5 लाख शिवप्रेमी किल्ले रायगडावर येतील. यावेळी किल्यावर दोन व्याख्यान होतील आणि 4 जून रोजी सकाळी लाखो धारकरींच्या घोषात व शिवप्रभूंच्या साक्षीने सोन्याच्या सिंहासनाचा संकल्प करतील.’’

विशेष म्हणजे, या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी कोणत्याही शासकीय सुरक्षा यंत्रणेचे सहकार्य घेणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील किमान एक हजार सशस्त्र धारकरी सिंहसनाचं रक्षण करतील, असंही भिडे गुरुजी म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या सिंहसनाचा इतिहास

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळी महाराजांसाठी खास 32 मण वजनाचं सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं. हे सिंहासन रायगड जिल्ह्यातील पोलादपुरचे रामजी दत्तो चित्रे यांनी घडवलं होतं. या सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणितनवरत्ने जड्वलेली होती. आज सिंहासनाचे वजन किलोमध्ये केल्यास 144 किलो होईल.

इतिहास कालिन नोंदीनुसार वजनाचे कोष्टक

  • 24तोळे : 1 शेर (जुना तोळा सध्याच्या ११.७५ ग्रॅमचा होता)

  • 16 शेर : 1 मण ( 1शेराचे वजन : 11.75 ग्रॅम x 24 तोळे = 282 ग्रॅम)

  • 1 मण : 282 ग्रॅम x 16 शेर = 4512 ग्रॅम (4.5 किलो)

  • 32 मण : 4512 x 32 = 144384 ग्रॅम (144 किलो)


संदर्भ : शिवचरित्र (बाबासाहेब पुरंदरे)