सांगली :  राज्य सरकारने वाईनला परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय हा संतापजनक, समाजाला हानिकारक आणि देशाचे देशपन नाश करणारा असल्याचे वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. सरकारने वाइन सुरू करून जुगार लावलेला आहे. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता असेही भिडे यावेळी म्हणाले. सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी डान्सबार बंदी करण्याचा निर्णय घेतला होता असेही भिडे यावेळी म्हणाले. राज्य सरकारने किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. यावरुन भिडे यांनी राज्य सरकारवर निशाणा लगावला आहे.


राज्यपालांकडे मंत्रीमंडळ बरखास्त करण्याची मागणी करणार


आरक्षणासाठी हापापलेल्या संस्थानी या निर्णयाविरोधात आवाज उठवला पाहिजे. महाराष्ट्राने देशाला देशपन, इतिहास दिला आहे. महाराष्ट्र शासन जर असे काहीही निर्णय घेत असेल तर महाराष्ट्र कुठे जातोय असे भिडे यावेळी म्हणाले. ज्या मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतलाय त्यांना कोणती शिक्षा द्यावी असे ते म्हणाले. मंत्रिमंडळावर पुढच्या पिढीला प्रकाश वाट दाखवण्याची जबाबदारी असून, त्यांनीच हा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून हे मंत्रीमंडळ बरखास्त करा असे सांगणार असल्याचे भिडे यांनी सांगितले. 


नरेंद्र मोदी यांच्यासारखा चांगल पंतप्रधान देशाला लाभला आहे.  मोदींनी लोकसभेत दारू बंदीचा   ठराव करून दारूला तिलांजली द्यावी असे भिडे यावेळी म्हणाले. एक मराठा लाख मराठा हे वाक्य प्रेरणादायी आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणीही यावेळी भिडेंनी केली.  मुंबईला नाईट लाईफ देणार ही भाषा म्हणजे समाजला व्यभिचाराकडे नेणारी असल्याचं त्यांनी सांगितले.


दारुला मुक्तता तर मग गांजा शेतीला का आडवे


दारूला जर मुक्तता दिली जात असेल तर मग गांजा शेतीला का आडवे लावले जातेय? असा सवालही संभाजी भिडे यांनी केला. गांजा शेतीला परवानगी द्या असे म्हणाणारा हा समाज असल्याचे ते म्हणाले. दारुच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्रिमंडळशी बोलणार आहे. वाईनचा निर्णय मागे घ्यावा याबाबतची मागणी करणार आहे. देशासाठी हा निर्णय कसा घातक आहे हे त्यांना सांगणार असल्याचे भिडे यावेळी म्हणाले. लिव्ह-इन रिलेशनशिप योग्य आहे असे सांगणारे न्यायालय देखील चूक आहे. माझ्यावर भले गुन्हे दाखल झाले तरी चालतील असेही भिडे यावेळी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या: