अहमदनगर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रगीतानंतर खुर्चीवर बसत असतानाच भोवळ आली. गडकरींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती मिळत आहे. शुगर कमी-जास्त झाल्याने त्यांना चक्कर आल्याची शक्यता वर्तवली आहे.


अहमदनगरच्या राहुरी मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. गडकरी यांच्या भाषणानंतर राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना अचानक चक्कर आली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नितीन गडकरींना सावरलं.

या घटनेमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. राष्ट्रगीतानंतर ते खुर्चीवर बसत असताना त्यांना चक्कर आल्याने ते कोसळले. यावेळी राज्यपालांनी त्यांनी सावरलं. यानंतर डॉक्टराचं एक पथक तिथे दाखलं झालं. त्यांनी गडकरींना इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती स्थिर असल्याचं कळतं.

दरम्यान, नितीन गडकरी त्यांचा दौरा पूर्ण करणार आहेत. गडकरी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेणार असून त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळत आहे. याआधी दौरा रद्द करुन त्यांना विशेष विमानातून नागपूरला रवाना होणार असल्याच झाल्याचं सांगितलं जात होतं.

तर नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. "शुगर लो झाल्यामुळे तब्येत बिघडली होती. पण डॉक्टरांच्या उपचारांनंतर प्रकृती सुधारली आहे. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभार," असं गडकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काळजी करण्याचं कारण नाही : गडकरी

शुगर कमी असल्यानं प्रकृती बिघडली होती. राहुरीला थोडंसं सफोकेशन झालं त्यामुळं ऑक्सिजन कमी मिळाल्याने चक्कर आली. आता माझी तब्येत ठीक आहे. माझी काळजी करणारे अनेक फोन आले. अनेकांनी चिंता व्यक्त केली. मी त्यांचा आभारी आहे, असं गडकरी यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. गडकरी यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.