मुंबई : शिवसेनेचा आज 53 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहे. मात्र येत्या वर्धापन दिनाला शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आला आहे. भाजपशी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे, असं देखील या अग्रलेखात म्हटलं आहे.

'शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला, याच निर्धाराने कामाला लागूया', अशी भूमिका सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आली आहे.

आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसनेचा वर्धापन दिन साजर करण्यात येणार आहे. सामनाच्या अग्रलेखातील या भूमिकेनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल अशी घोषणा करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

"मी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय उद्धव साहेब घेतील," : आदित्य ठाकरे

विधानसभेसाठी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा नाराजीनाट्य