उस्मानाबाद :  आर्थिक अडचणीला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यातील सांजा या गावातील सलून चालकाने विष घेऊन आत्महत्या केली आहे. मनोज दगडू झेंडे (45) असे आत्महत्या केलेल्या कटिंग दुकानदाराचे नाव आहे.  'आमची दुकाने बंद आहेत , सरकारचा चुकीचा निर्णय आहे, माझ्या लहान लेकरांचे मी 5 हजार रुपयात कसे भागवायचे,' अशी चिठ्ठी झेंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली आहे. 


उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात 2 मुले व एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. मुलीचे लग्न झाले आहेत तर एक मुलगा 17 वर्ष तर दुसरा 12 वर्षांचा आहे. झेंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


नेमकं काय लिहिले आहे चिट्ठीत?


केसकर्तनालयाच्या दुकान मालकाने  आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहिली असून, या चिट्ठीत त्यांनी लिहिले आहे की, मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे. दरम्यान, त्यांनी चिट्ठीत मी कोरोनाला आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. असं देखील म्हटलं आहे. आमची दुकाने बंद आहेत, आम्ही 5 हजार रुपयावर घर कसे चालवायचे असं देखील मनोज झेंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठीत लिहिले आहे. मनोज झेंडे यांनी विषारी औषध पिऊन आपले आयुष्य संपविले आहे.


शासनाने आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी
मनोज झेंडे यांच्या आत्म्हत्येनंतर नाव्ही समाजातील सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी यांनी देखील आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने केसकर्तनालयाचे दुकाने बंद करण्याचे आदेश काढले आहेत, त्यामुळे समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे, असं म्हटलं आहे. याचा पहिला बळी उस्मानाबाद जिल्ह्यात गेला आहे. एकतर शासनाने आम्हाला कुठलीही मदत केलेली नाही. आमचा उदरनिर्वाह फक्त केसकर्तनालयाच्या दुकानावर आहे. मुलांचे शिक्षण आणि घरभाडे आणि दुकानभाडे हे कुठून द्यायचे असा सवाल सचिन चौधरी यांनी उपस्थित केला आहे. एकतर शासनाने आम्हाला दुकाने उघडायची परवानगी द्यावी नाहीतर आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. रोज रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं बर असं देखील त्यानी म्हटलं आहे.


गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रकोप सर्वत्र आहे. कोरोनामुळं अनेकांचे उद्योग व्यवसाय बंद पडले. त्यात लॉकडाऊनने तर अनेकांचे कंबरडे मोडले. छोट्या व्यावसायिकांवर तर उपासमारीची वेळ आली. यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून सरकारचा निषेध करण्यात आला आहे.  सरकारनं जाहिर केलेल्या लॉकडाऊनमध्ये नाभिक बांधवांचे व्यवसाय बंद पडले. उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही सरकारला वारंवार निवेदनं दिली मात्र आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. अशात अशा घटना घडत आहेत, त्यामुळं आम्ही सरकारचा निषेध करतो, असं महाराष्ट्र नाभिक महामंडळानं म्हटलं आहे.