उस्मानाबाद : 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. परंतु, संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे ते उद्या सकाळी होणाऱ्या साहित्यदिंडीला हजर राहू शकणार नाहीत अशी माहिती मिळत आहे. फ्रान्सिस दिब्रेटो यांना मणक्याचा त्रास जाणवू लागल्याने ते ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार नाहीत. त्याचप्रमाणे उद्घाटक ना. धो. महानोर हेदेखील गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने या ग्रंथदिंडीला हजर राहू शकणार नाहीत, अशीही माहिती मिळत आहे.


पाहा व्हिडीओ : मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद सज्ज, उद्यापासून संमेलनाला सुरुवात 



उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत असून या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ना. धो महानोर असणार आहेत. परंतु, ना. धो महानोर यांना तुम्ही संमेलनाला जाऊ नका, असा धमकीवजा फोन आला होता. तरिही एबीपी माझाशी याबाबत बोलताना आपण संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती महानोर यांनी दिली होती. तसेच गृह खात्यानं तातडीनं दखल घेत त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. यासंदर्भात ना. धो महानोर यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, धमकी हा शब्द माझ्या हिशोबात बसत नाही. धमकी मला दिलेली नाही, माझ्याशी फोनवरून संवाद साधण्यात आला. तसेच एक पत्र मला देण्यात आलं आहे. ब्राम्हण महासंघ पुण्याचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्र पाठवून सविस्तरपणे आपलं मत मांडलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड आम्हाला मान्य नाही. त्यांचं लेखन, त्यांची विचारसरणी हे आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे आम्ही पत्रकं काढून त्याचा निषेध करणार आहोत.' पुढे बोलताना ना. धो महानोर म्हणाले की, नियमानुसार एकमताने दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच नसून मी संमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, 10 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो असणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र त्यांच्या निवडीला अनेकांनी विरोध केला होता. दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित असल्यामुळे मराठी साहित्यामध्ये दिब्रिटो यांचे कामच नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदी त्यांची निवड करू नये अशी मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.

संबंधित बातम्या : 

साहित्य संमेलनाचे उद्घाटक ना. धो. महानोर यांना धमकीचा फोन; गृह खात्यानं पुरवली सुरक्षा