राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुख
एबीपी माझा वेब टीम | 17 Feb 2018 03:31 PM (IST)
गोहत्येच्या नुसत्या संशयावरुनही माणसांना मारलं जात आहे आणि गोपालन हा अतार्किक श्रद्धेचा विषय ठरवत माणसांना हिंसक केलं जात आहे, अशी टीका देखमुख यांनी आपल्या भाषणात केली.
NEXT PREV
बडोदा : बडोदामध्ये आयोजित 91 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असहिष्णुतेविरोधात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा एल्गार पुकारला आहे. 'राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजे' अशा शब्दात गुजरातच्या भूमीवर देशमुखांनी कान टोचले. 'देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्कारवापसीचा मार्ग काही लेखकांनी स्वीकारला. त्यामागील त्यांची भूमिका शासनानं मोठ्या मनानं समजून घ्यायला हवी होती. आधुनिक-सुसंस्कृत जगात शासन हे कलावंतापुढे नम्र असतं, असायला हवं. भारतात ही सुसंस्कृतता आज दिसत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. तुम्ही या अर्थाने लोकशाहीचं तत्त्व पाळत नाही आहात. म्हणून मी असं म्हणण्याचं धाडस करतो की राजा तू चुकत आहे! तू सुधारलं पाहिजे.' असं लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले. देशमुख यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पुरस्कार वापसी, दाभोलकर-पानसरे हत्येतील तपासात झालेली दिरंगाई यासारख्या विषयांवर भाष्य केलं. सत्ताधारी भाजपचा थेट उल्लेख टाळत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केले.