सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परूळे येथील सिंधुदुर्ग विमानतळावर आज गोवा ते सिंधुदुर्ग विमानतळ असा 24 मिनिटाचा एअर अलायन्सच्या विमानाने सुरक्षित प्रवास करून यशस्वी चाचणी केली. सिंधुदुर्ग विमानतळाचं लोकार्पण सोहळा येत्या 9 ऑक्टोबरला असून तमाम सिंधुदुर्ग वासियांच्या नजरा या उद्घाटन कार्यक्रमात लागल्या आहेत.
 
तब्बल वीस वर्षानंतर सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे शनिवार 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी, आयआरबी व एअर अलाईन्स विमान कंपनीने नियोजन केले आहे. विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमिवर दोन दिवस आधीच गोवा ते सिंधुदुर्ग असा एअर अलायन्सच्या विमानाने अवघ्या 24 मिनिटांचा प्रवास केला. यावेळी पायलटसह टेक्निकल स्टाप विमानासोबत होता. यावेळी विमानात इंधन भरण्याचे प्रात्यक्षिकही झाले. त्यानंतर एका तासाने अलायन्स एअरचे विमान सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवरून टेक ऑफ घेत पुन्हा गोव्याच्या दिशेने झेपावले. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


2018 मध्ये केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभु आणि तेव्हाचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर असताना अशाच प्रकारे गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर गणेशाची मूर्ती घेवुन विमानाचे टेस्ट लँन्डिंग झाले होते. त्यानंतर सुरेश प्रभुही विमानाने त्या धावपट्टीवर उतरले होते. पण त्यावेळी सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पूर्ण नसल्याने केंद्रिय हवाई वाहतूक मंत्रालयाकडून विमानतळास परवानगी मिळाली नव्हती. आता विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने डिजीसीएकडुन सर्व परवानग्या मिळाल्याने विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभुमीवर विमानाचे टेस्ट लँन्डिंग यशस्वी पार पडले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमावर असणार आहे. 


सिंधुदुर्ग विमानतळ कोणी सुरू केलं यावरून सिंधुदुर्गात मोठं राजकारणसुद्धा पहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे विमानतळ मी बांधून पूर्ण केलं असं म्हणतात. तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हे विमानतळ आपल्या काळात पूर्ण झालं असून आपल्याच काळात सूरु होत आल्याचं म्हटलं आहे.


सिंधुदुर्ग विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात पत्रकारांवर अनेक बंधन घालण्यात आली आहेत. कोकणातील एक मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन होत असताना पत्रकारांमध्ये मोठी उत्सुकता असताना आयोजकांनी अनेक निर्बंध घातले गेल्याने पत्रकारांमध्ये नाराजी आहे. एक वृत्तपत्राचा एकच प्रतिनिधी तर माध्यमांचा एक प्रतिनिधी व कॅमेरामन एवढ्याना परवानगी देण्यात आली तर सोशल मीडियाला परवानगी नसल्याने सोशल मिडिया ९ ऑक्टोबरला आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.