Dapoli Sai Resort scam : दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. सदानंद कदम यांची ईडी कार्यालयात जवळपास 4 तासांपासून चौकशी सुरु होती.  उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

  
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडी सदानंद कदम यांची चौकशी करण्यात आली.  दापोलीतल्या कुठेशी गावात ईडीचे पथक आज  सर्च ऑपरेशन साठी गेलं होत. त्यानंतरब कदम यांना चौकशीसाठी मुंबईच्या ईडी  कार्यालयात बोलावण्यात आले होते. चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक करण्यात आली आहे. 


दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे.  सदानंद कदम हे रामदास कदमांचे भाऊ आहेत. दोन भावांमधली कोकणी भावकी सर्वश्रूत आहे. सदानंद कदम राजकारणात फार सक्रीय नाहीत पण 
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातून विस्तव जात नाही. सदानंद कदम यांनी अनिल परब यांच्याकडून साई रिसॉर्टची जमीन 2020 ला विकत घेतली. याच व्यवहारात अफरातफर झाल्याचा इडीचा आरोप आहे.


गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. याच साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांकडून सदानंद कदमांचंही नाव जोडण्यात आलं होतं. याप्रकरणी विनायक राऊतांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची खेडमध्ये झालेली सभा यशस्वी होण्यामागे सदानंद कदम यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचं विनायक राऊतांनी म्हटलं आहे.  


पाच मार्चला उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये खणखणीत सभा घेतली आणि भाजप-शिवसेना विरूद्ध ठाकरे गट या वादाची धार आणखी तीव्र झाली. खेड हा रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचा मतदारसंघ आहे. खेडमधल्या या सभेची आणि त्यानंतरच्या प्रतिक्रियांची धुळ खाली बसायच्या आतच आज इडीने खेडमध्ये एंट्री मारली. शुक्रवारी सकाळी इडीने रामदास कदम यांचे धाकटे बंधु सदानंद कदम यांना ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर अटक केलं.  


खेडच्या सभेसाठी सदानंद कदम यांनी पडद्याआडून जोरदार ताकद लावल्याची चर्चा होती. सभेनंतर चारच दिवसांनी इडीची कारवाई झाली आणि शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर टीकेची झोड उठवली.  पण काका सदानंद कदम यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीरच आहे असं योगेश कदम यांचं म्हणणं आहे. इडीच्या कारवाया ही महाविकास आघाडीची सध्याची सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे.. सभेला उत्तर म्हणून इडीची कारवाई हा ठाकरे गटाचा दावा असेल तर भविष्यात उद्धव ठाकरेंसमोरची आव्हानं किती वाढू शकतात याची सहज कल्पना करता येईल.. त्यामुळे निवडणूका जशा जवळ येतील तसा हा वाद आणखी तीव्र होत जाईल हे स्पष्ट आहे....