कोल्हापूर: ‘राजू शेट्टींनी आपल्या बगलबच्च्यांना लगाम घालावा. अन्यथा त्यांचा बंदोबस्त करावा लागेल.’ असं म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींवर हल्लाबोल केला. ते कोल्हापुरात बोलत होते.


‘कोणाला तरी बरं वाटावं म्हणून मी काम करत नाही. मी चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आहे.’ असंही सदाभाऊंनी ठणकावून सांगितलं.
'सदाभाऊ राजपुत्राच्या घरात जन्माला आलेला नाही. मी इथं आलेलो आहे ते लाठ्याकाठ्या खाऊन. त्यामुळे आमच्या मिशीला खरकटं लागलेलं आहे कसं कुणाला वाटत असेल तर त्यांनी नाकाला रुमाल लावून घ्यावा. आम्ही आमच्या मिशा पुसून स्वच्छ जाऊ' अशा शब्दात सदाभाऊंनी राजू शेट्टींना उत्तर दिलं आहे.

‘मी आत्मक्लेश यात्रेपासून लांब राहावं असं राजू शेट्टी यांना वाटत असेल तर हरकत नाही. मी मळलेल्या वाटेवरुन चालणार कार्यकर्ता नाही. सदाभाऊ स्वतःची वाट स्वतः निर्माण करतो.’  असं म्हणत सदाभाऊ यांनी राजू शेट्टी यांना उत्तर दिलं आहे.

‘सदाभाऊ खोत वाट चुकलेत, पण त्यांना परत आणू.’ असं वक्तव्य राजू शेट्टींनी माझा कट्ट्यावर केलं होतं. त्यांची ही टीका सदाभाऊंना चांगलीच झोंबली असून त्यांनी याला उत्तर दिलं आहे.

आमच्या मिशीला कुणाचं खरकटं नाही: राजू शेट्टी

‘आमच्या मिशीला कुणाचं खरकटं लागलेलं नाही. आम्ही कुणाच्याही मिंद्यात नाही. जिथं-जिथं चूक असेल, तिथे सरकारविरोधी भूमिका घेऊन स्वाभिमान दाखवू. शिवाय आमचं चुकलेलं लेकरु परत आणू’, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या दुराव्याबाबत ‘माझा कट्ट्या’वर भाष्य केलं होतं.

‘माझ्यातला आणि सदाभाऊंमधला वाद वैचारिक आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन सरकारशी संघर्ष करताना सत्तेत राहायचं की नाही यावरुन मतभेद आहेत. पण आमचे टोकाचे मतभेद नाहीत’, असंही राजू शेट्टी म्हणाले होते.

संबंधित बातम्या

आमच्या मिशीला कुणाचं खरकटं नाही: राजू शेट्टी

खासदार राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांना अल्टिमेटम


मी हनुमान, सोन्याच्या लंकेतील शेतीरुपी सीता शोधायचीय : सदाभाऊ