मुंबई : मला माहितंय की, दूध कसं ओतलं जातं, त्यात दूध किती असतं, त्यात पाणी किती असतं, ते कसं ओतलं जातं, याच्यातूनच मी पुढे आलेलो आहे, असे म्हणत कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या दूध आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली.

सदभाऊ नेमंक काय म्हणाले?  

"ज्या पद्धतीने गेली 30 वर्षे मी आंदोलनं करत आलोय, त्यावरुन मला माहितंय की, दूध कसं ओतलं जातं, दूध किती असतं, त्यात पाणी किती असतं, ते कसं ओतलं जातं, याच्यातूनच मी पुढे आलेलो आहे. शिवाय, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. मात्र हे आंदोलन 'मी कुणीतरी आहे आणि वैयक्तिक लोकसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून, तसेच राज्यातील शेतकऱ्यांचा नेता मीच आहे, मलाच शेतकऱ्यांचं समजतं', असं एका गर्विष्ठ पद्धतीने शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे, एका व्यक्तीसाठी हे आंदोलन चाललेले आहे, राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन नाही.", असे सदाभाऊ खोत म्हणाले.

"सर्व पक्षांच्या गटनेत्यांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी दूध प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली. दूध भुकटीला 50 रुपये प्रति किलो निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर काही सहकारी संघ आणि खासगी दूध संघांनी पुण्यामध्ये बैठक घेऊन, 21 तारखेपासून प्रति लिटर 3 रुपये दूधाचा भाव वाढवतोय, अशी घोषणा केली. त्यांनी 3 रुपयांची जशी घोषणा केली, तशीच घोषणा ज्यांचे दूध संघ आहेत, मग ते खासगी असतील, त्यांनी 3 रुपये वाढीची घोषणा करावी. त्यातून शेतकऱ्यांचा प्रश्न आपोआप सुटेल.", असेही सदभाऊ यावेळी म्हणाले.

ज्याला प्रश्न सोडवायचे आहे, त्यांना निमंत्रणाची गरज नसते : सदाभाऊ

तसेच, "राजू शेट्टींनी चर्चेसाठी यावं. सरकारचे दरवाजे उघडे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री 24 तास काम करत असतात. राज्यातील सामान्यातील सामान्य माणूस मुख्यमंत्र्यांना भेटून आपलं गाऱ्हाणं मांडू शकतो. ज्याला प्रश्न सोडवायचे आहेत, त्याला निमंत्रण देण्याची गरज भासत नाही." असे म्हणत सदाभाऊंनी राजू शेट्टींवर निशाणा साधला.

राजू शेट्टींचं दूध आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासून दूध आंदोलन सुरु केलं आहे. पंढरपुरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत खासदार राजू शेट्टी यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. अनेक प्रमुख शहरांना होणारा दुधपुरवठा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखला आहे. दरम्यान मुंबईच्या दुधपुरवठ्यावर अद्याप याचा कोणतीही परिणाम झाला नसल्य़ाचं दिसत आहे. दुधाला प्रतिलीटर ५ रुपयांची दरवाढ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे.

पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर दूधाचा पुरवठा रोखण्यात आलाय. पुण्यात तर रस्त्यावर दूध फेकून देण्यात आलंय. गोकुळसह काही दूध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. सोलापुरातील माढा आणि सांगोला तालुक्यात दूध रस्त्यावर ओतून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. अमरावतीत राजू शेट्टींच्या काही कार्यकर्त्यांनी दुधाचा एक टँकर फोडण्याचा प्रयत्न केला.

VIDEO : पाहा सदाभाऊ काय म्हणाले?