औरंगाबाद : पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी परीक्षेत पास होणे आवश्यक असते. मात्र औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं नापास विद्यार्थ्यांनाही पदव्या दिल्या आहेत. तांत्रिक घोळातून हा प्रकार झाल्याचं कुलगुरुंनी सांगितलं. तसेच याबाबत चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे.


विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे मोठी नाचक्की झाली आहे. पदवी प्रमाणपत्र छापण्याचं कंत्राट शेषशायी या कंपनीला देण्यात आलं होतं. या कंपनीला माहिती देतांना विद्यापीठाकडून काही नापास विद्यार्थ्यांची नावं देखील देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या पदव्या सुद्धा छापल्या गेल्या.


पदव्यांच्या घोळाचा प्रकार उघड झाल्यानंतर विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. या घोळाबाबत कुणीही बोलायला तयार नव्हते. अखेर परीक्षा नियंत्रक डॉ. दिगांबर नेटके यांनी घडलेल्या प्रकाराची चूक मान्य करत जबाबदारी स्वीकारली आणि पुन्हा चूक होणार नाही याची शाश्वती दिली.


कुलगुरू बी.ए.चोपडे यांनी घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. 65 हजार पदवींपैकी काही नापास विद्यार्थांचे पदवी प्रमाणपत्र छापण्यात आल्याचं कुलगुरुंनी कबूल केलं. याबाबत काही जणांना कारणे दाखव नोटीस देत कुलगुरुंनी कारवाईचे संकेत दिले आहेत.