Sangli News Update : महाविकास आघाडी विकास कामांवर बोलायला तयार नाही. परंतु, एका शकुनीमामाकडून सतरंजीवरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्याचं काम होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामाचा सुळसुळाट असतो त्याची सेना कौरवाची सेना असते आणि आम्ही पांडवाची सेना आहे. आम्ही या कौरवांचा नाश करु, असा हल्लाबोल माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
सांगलीत माध्यमांसोबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. 'जागर शेतकऱ्यांचा आक्रोश बहुजनांचा' हे राज्यव्यापी अभियान 29 एप्रिल पासून कोकणातून सुरू करत असल्याची घोषणाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यात सध्या फक्त फालतुगिरी सुरू आहे. हे सरकार नोकर भरतीवर बोलत नाही. सरकारने आरोग्य भरतीमध्ये घोटाळा केला आहे. हे सर्व जनतेसमोर या अभियानातून मांडण्यात येणार असल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. ते फक्त मातोश्री बाहेर डायलॉग बाजी करतील. एक आजी आली आणि डायलॉगबाजी केली तर मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. या महाराष्ट्रामध्ये अनेक आजीबाई आहेत, त्यांचे डोळे पुसायला मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला का? असा प्रश्नही खोत यांनी यावेळी उपस्थित केला.
सदाभाऊ खोत म्हणाले, "आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. सरकारमध्ये गुंडगिरी उफाळून आली आहे. या सर्व विषयांवर जनतेमध्ये जाऊ आणि संघर्ष उभा करू. हनुमान चालिसाच्या मुद्यावरून राणा दाम्पत्यावर गुन्हे दाखल केले जातात. त्यांच्या घरावर जाऊन गुंडागर्दी केली जाते. परंतु, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. मग शरद पवार यांच्या घरावर जे गेले त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले? ते सर्व सामान्य लोक होते. त्यामुळे हे राज्य गुंडाराज्य झाले आहे.
'अमोल मिटकरी तमाशा फडावरचा नाचा'
अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशा मधील फडावरचा नाचा आहे. तोडा फोडा अशी नीती राष्ट्रवादीची आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.