नांदेड : कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली प्रार्थनास्थळं घटस्थापनेच्या मुहूर्तावर आजपासून उघडण्यास सरकारनं मंजुरी दिली. शीख धर्माची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या आणि जगभरातील शीख धर्मियांचे पवित्र धर्मस्थळ असणाऱ्या नांदेड येथील जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा येथे देश-विदेशातील भाविक दर्शनासाठी येत असतात. आजपासून सचखंड गुरुद्वारात भाविकांना शासनाचे नियम पाळून प्रवेश देण्यात येणार आहे.


गेल्या अनेक महिन्यापासून गुरुद्वारा बंद


शीख धर्माची दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या नांदेड सचखंड गुरुद्वारा येथे देश-विदेशातील भाविकांची मोठी गर्दी असते. गेल्या अनेक  महिन्यांपासून गुरुद्वारात दर्शन बंद होते. भाविकही नसल्यामुळं येथील व्यापारही ठप्प होता. येथील व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान आजपासून भक्तांसाठी गुरुद्वारा परिसर खुला होणार आहे. त्यामुळे सध्या गुरुद्वारा परिसरात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. 




घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय 


थांबलेला कोरोनाचा प्रसार मधल्या काळात वाढला होता. त्यामुळे तो पुन्हा रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे देशातील प्रार्थनास्थळंही बंद होती. राज्यातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत घट होत असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यातच मंदिरं, धार्मिक स्थळं उघडावी अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारनं आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं आणि प्रार्थनास्थळं उघडण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या निर्णयानुसार, मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च गुरुवारपासून उघडण्यात येणार आहेत.


जिल्हा प्रशासनाच्या विविध नियम आणि अटी 


शासनानं कोरोना लॉकडाऊन सवलतीत प्रार्थनास्थळं उघडण्याची परवानगी दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी आदेश जारी केले आहेत. सुरक्षित अंतर, मास्क वापरणे.  40 ते 60 सेकंदपर्यंत हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे, यासह विविध नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. आता बंद असलेल्या गुरुवारपासून मंदिरे, मस्जिदी, चर्च, विहार, गुरूद्वारा आदी धार्मिक स्थळांचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार आहेत.


लॉकडाऊन काळात उत्तम सेवा
 
लॉकडाऊन काळात गुरुद्वारा बोर्डाने दररोज लाखो गोरगरीब वस्तीत व अडकून पडलेल्या प्रवाशांना जेवण दिले. तसेच गुरुद्वारा बोर्डाचे एनआरआय भवन कोविड सेंटर म्हणून सेवा देत आहे. उत्तम स्वच्छता आणि सकस आहार रुग्णांना मिळत असे. एकप्रकारे संपूर्ण जिल्ह्यात सर्वात मोठी व चांगली सेवा देऊन गुरुद्वाराने माणुसकीचे नाते जपलेय.