Maharashtra Rain बुलढाणा: हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने  (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. पश्चिम विदर्भ आणि मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भातील बहुतांश भागात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हनुमान सागर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून काल रात्री  तीन हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील वान नदीला मोठा पूर आल्याचे चित्र आहे. 


चुकीच्या ठिकाणी बांध बांधला म्हणून गावात पूर  


परिणामी, वान नदीला आलेल्या पुरामुळे जवळपास आठ ते दहा गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला असून पुरामुळे शेकडो हेक्टर वरील केळीचे पीकही पाण्याखाली गेले आहे. तर जिल्ह्यातील मोमिनाबाद, वडगाव, वान, कोलद या गावांचा संपर्क गेल्या अनेक दिवसापासून तुटला आहे. वान नदीवर मोमिनाबाद गावाजवळ प्रशासनाने चुकीच्या ठिकाणी बांध बांधल्याने ही परिस्थिती उद्भवली, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोमिनाबाद या गावाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने लक्ष दिलं नसल्याचा आरोप ही गावकऱ्यांनी केला आहे.


विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प 


मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव पूल गेल्या एक तासापूर्वी पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून वाहतूक बंद केली. रात्रभर झालेले पाणी तसेच कयाधु नदीला मराठवाडा मधून आलेल्या पाण्यामुळे पुलावर पाणी आले आहे. ईसापूर धरणाचे पाणी अद्याप सोडण्यात आले नसून ते केव्हाही सुटू शकते आणि परिस्थिती अधिक गंभीर होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व त्रासास नदीवरील निर्माण होणारा नागपूर- बोरी तुळजापूर महामार्वरील पूल कारणीभूत असून अनेक वर्षांपासून त्याचे काम रखडले आहे. मागील वर्षी जिल्हाधिकारी यांनी त्यास तंबी दिली होती. परंतु वर्ष उलटुन ही अद्याप पुलाची एकेरी देखील वाहतूक सुरू करण्यास कंत्राटदार असमर्थ ठरला आहे. त्याचा नाहक त्रास वाहन धारकांना, प्रवाशांना सोसावा लागत आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


परभणीवर वरुणराजाची कृपादृष्टी 


परभणी जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरातील पाणी प्रकल्पांमध्ये वाढ झाली आहे. लोअर दुधना प्रकल्पात जवळपास 34 टक्के तर येलदरीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येलदरी प्रकल्प 51 टक्क्यांनी भरलं आहे. लोअर दूधनाही 61.93 टक्के भरलं आहे. दरम्यान, दुधना आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मासोळी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे. दुधना आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


हे ही वाचा