मुंबई : राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला तरी ते अजरामर राहतील. गडकरींच्या पुतळ्यावर ज्यांनी रात्रीच्या अंधारात हल्ला केला, ते मर्द महाराष्ट्राचे दुश्मन आहे, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून करण्यात आली आहे.

औरंगजेब आणि अफझलखानाच्या कबरीवर हल्ला करण्याची हिंम्मत नसणारे लोक अंधारात प्रतिभासम्राटाचा पुतळा हटवतात तेव्हा त्यांची कीव येते. शिवाजीराजांचे व संभाजीराजांचे नाव वापरून राजकारण करणारे हे लोक भ्याड आहेत, असा टोला 'सामना'तून लगावला आहे.



आधी गडकरींचा देह नष्ट झाला, आता त्यांचा पुतळा नष्ट केला मात्र तरीही गडकरी अजरामर राहतील, असं 'सामना'त म्हटलं आहे.

तसंच मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका निवडणुकीची चिंता सोडून पुण्यातील संस्कृतीभंजकांना अद्दल घडवणारी कारवाई करण्याचं धाडस दाखवावं, असं आवाहनही शिवसेनेने सामनातून केलं आहे.

काय लिहिलं आहे 'सामना'त?

…तरीही राम गणेश गडकरी अजरामर राहतील!

राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावर ज्यांनी रात्रीच्या अंधारात हल्ला केला ते मर्द महाराष्ट्राचे दुष्मन आहेत. अंधारात नेहमी पाप होते व पापाला शासन हे होतच असते. मराठी भाषा, साहित्य, नाट्य ज्यांनी अजरामर करून सोडले त्या प्रतिभासम्राट राम गणेश गडकरी अर्थात महाराष्ट्र कवी गोविंदाग्रजांचा पुतळा पुण्यातील संभाजी उद्यानातून काही भ्याड हल्लेखोरांनी हटवला आहे. गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकातील काही प्रसंगांमुळे छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी झाल्याचा ठपका ज्या मंडळींनी ठेवला आहे ते महाराष्ट्राचे सांस्कृतिक व सामाजिक वैरी आहेत. राज्यात जातीपातीचे विषारी प्रवाह निर्माण करण्याचा हा प्रकार पुन्हा सुरू झाला असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका निवडणुकांची चिंता सोडावी व पुण्यातील संस्कृतीभंजकांना अद्दल घडवणारी कारवाई करण्याचे धाडस दाखवावे. निवडणुकीत जातीधर्माच्या आधारावर प्रचार करणे हा गुन्हा असल्याचा निकाल सोमवारीच सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निकालाचा पूर्ण ‘निकाल’ लावणारे कृत्य पुण्यात घडले आहे. गडकरी यांच्या पुतळ्यावरील हल्ला हा जातीय विद्वेषाचा फूत्कार आहे व यामागे सरळ पालिका निवडणुकांचे जातीय राजकारण दिसते. जातीय विद्वेषातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा ज्यांनी हटवला, जातीय त्वेषातून समर्थ रामदास स्वामींची बदनामी केली त्या लोकांनी राम गणेश गडकरींचा पुतळा काळोखात हलवून महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्था ‘एकच प्याला’त गटांगळ्या खात असल्याचे सिद्ध केले आहे.

प्रतिभासम्राटाचा पुतळा हटवणाऱ्यांची कीव!

‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘राजसंन्यास’ या नाटकांनी गडकरींना अजरामर केले. अशा महान प्रतिभासम्राटाचा पुतळा काळोखात हटविणारे हे शिवविचारांचे दुश्मन व महाराष्ट्राचे वैरी आहेत. शिवाजीराजांचे व संभाजीराजांचे नाव वापरून राजकारण करणारे हे लोक भ्याड आहेत. ज्या पापी औरंग्याने संभाजीराजांना हालहाल करून मारले त्या औरंग्याची कबर तीर्थस्थळ बनले आहे व तेथे सरकारी बंदोबस्त आहे. तो बंदोबस्त तोडून औरंग्याच्या कबरीवर हल्ला करण्याची हिंमत यांच्यात नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्याचा मारेकरी अफझलखान शांतपणे पहुडला आहे व त्याचे राजकीय, धार्मिक उदात्तीकरण सरकारी खर्चाने चालले आहे. त्या कबरीतल्या अफझालखानाचा बालही बाका करू न शकणारे लोक रात्रीच्या अंधारात महाराष्ट्राच्या प्रतिभासम्राटाचा पुतळा हटवतात तेव्हा त्यांची कीव येते. आधी गडकरींचा देह नष्ट झाला, आता त्यांचा पुतळा नष्ट केला गेला. मात्र तरीही गडकरी अजरामर राहतील. त्यांची कीर्ती एकसारखी वाढतच राहील!