मुंबई : कन्हैयावर झालेल्या हल्ल्याचा आधार घेत 'सामना' या मुखपत्रातूनही शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. 'कन्हैयाचा गळा दाबल्याने त्याचा आवाज बंद होण्याची शक्यता नाही. खरं तर गळा दाबावा असे लोक आपल्या सभोवताली आहेत. ‘‘भारतमाता की जय बोलणार नाही’’ अशी मग्रुरीची भाषा करणार्‍या ओवेसीचा गळा दाबायला हे लोक पुढे येणार नाहीत.' असा टोला शिवसेनेने भाजपला हाणला
आहे.


 

'पठाणकोटचा बदला घेऊ असे आमचे संरक्षणमंत्री सांगतात, पण पाकिस्तानचा गळा दाबण्याची हिंमत दाखवणार आहात काय? असे अनेक प्रश्‍न देशात विचारले जात आहेत. कन्हैयाचा गळा दाबलात, पुढे काय? हा प्रश्‍न त्यातलाच आहे.' असंही सामनामध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधानांवर टीका करण्याची कन्हैयाची लायकी नाही, पण आसाम-बंगालमध्ये सभा घेणाऱ्या मोदींना मराठवाड्याचा आक्रोश ऐकायला येत नाही. त्यामुळे कन्हैयासारख्या टिनपाटांना बोलायला विषय मिळाला आहे. कन्हैयाच्या बोलवता धनी कोण आहे, याचं आत्मपरिक्षण भाजपनं करावं असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे.

 
'महाराष्ट्रासह देशातील 10 राज्यांमधील 256 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असून तेथील तब्बल 33 कोटी जनता दुष्काळाच्या फेर्‍यात तडफडत आहे. आपली भावंडे, पोरं-बाळं, आया-बहिणी उपाशी असताना शिवसेनेच्या घशाखाली तरी घास कसा उतरेल? मराठवाड्यात दोन-दोन महिने पाणी मिळत नाही. या दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दोनेक दिवस काढले असते तर बरेच झाले असते.'
अशा कानपिचक्याही देण्यात आल्या आहेत.

 
एकीकडे शिवसेनेने कन्हैयाची बाजू घेतलेली असताना रामदास आठवलेंच्या रिपाइंनेही कन्हैया कुमार प्रकरणावरुन भाजपला सल्ला दिला आहे. कन्हैयावर राष्ट्रदोहाचा गुन्हा लावणं चुकीच असल्याचं सांगत आठवलेंनी त्याच्यावर हल्ला करुन त्याला मोठं करु नका असंही म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ रामदास आठवलेंनी दिलेल्या या सल्ल्यावर भाजक काय प्रतिक्रिया व्यक्त करणार हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.