Saamana Editorial on BJP: अजित पवारांच्या (Ajit Pawar) शपथविधीनंतर पुन्हा एकदा राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) उद्भवला आहे. अशातच आज पुन्हा एकदा सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. मोदी इतरांना चोर म्हणतात, पण आताच्या भाजपमध्ये (BJP) 70-75 टक्के लुटीचा आणि आणि चोरीचा माल आहे, असं म्हणत सामनातून थेट मोदींवर हल्ला चढवण्यात आला आहे. तसेच, भ्रष्टाचाऱ्यांना व्यापारी वृत्तीने पाठीशी घालणं हा 'गुजरात पॅटर्न' आहे. संपूर्ण देशात तो लागू होताना दिसतोय, असं म्हणत सामना अग्रलेखातून भाजपला टोलाही लगावण्यात आला आहे. 'सब भूमी गोपाल की'  याप्रमाणे 'सब चोर  भाजप के' असेच आता वाटतंय, असं म्हणत भाजपवर टीका करण्यात आली आहे. 


"काँग्रेस म्हणजे 'लूट की दुकान, झूठ का बाजार' असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमध्ये बोलताना केला. हे त्यांचे बोलणे नेहमीचेच आहे. पंतप्रधानांना खरं तर स्वपक्षाविषयी बोलायचे होते, पण चुकून तोंडातून काँगेसचे नाव आले. काँगेस किंवा अन्य राजकीय पक्ष 'लूट की दुकान' असेल तर तो लुटीचा माल विकत घेऊन भाजप आपले घर का भरत आहे? याचा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी करायला हवा", असा सवालही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. 


सामना अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही फैलावर घेण्यात आलं आहे. "मुळात भाजप हाच आता राष्ट्रीय चोर बाजार झाला आहे. चोरीचा, लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून तो बदनाम झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे मोदींचीच थुंकी झेलून म्हणतात, ''मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. येताना दोघांना घेऊन आलो.'' हे दोघे म्हणजे शिंदे-अजित पवार. दोघांवर अमाप भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. म्हणजे ''येताना भ्रष्टाचाराचा व लुटीचा माल घेऊन आलो,'' असेच श्रीमान फडणवीस यांना सांगायचे असावे.", असं अग्रलेखात म्हटलं आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळ्यात भ्रष्ट पक्ष, त्याच पक्षाला लगेच मांडीवर घेतलं : सामना 


"पंतप्रधान मोदी आठ दिवसांपूर्वी म्हणाले होते, ''राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळय़ात भ्रष्ट पक्ष आहे.'' त्याच राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी लगेच मांडीवर घेतले. आता मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरदेखील हल्ला केला. केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार असा आरोप मोदी यांनी केला. आता आम्हाला भीती वाटते ती केसीआर पक्षाची. कारण मोदी ज्या पक्षाला भ्रष्ट मानतात तो पक्ष पुढच्या काही काळात भाजपचा मित्र बनून सत्तेत सहभागी होतो किंवा त्या भ्रष्ट पक्षात फूट पाडून त्यातला सगळय़ात भ्रष्ट गट भाजपवासी केला जातो. हाच भाजपचा राजकीय शिष्टाचार बनला आहे.", असं अग्रलेखात म्हटलं आहे. 


"तेलंगणामध्ये भविष्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे तेथील मुख्यमंत्र्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. उद्या हेच 'केसीआर' किंवा त्यांचा पक्ष फुटून भाजपात सामील झाला तर 'केसीआर' हे मोदींसाठी सगळय़ात सचोटीचे ठरतील. मध्य प्रदेशात भाजपचे लोक दलितांवर अत्याचार करीत आहेत. एका दलितावर भाजपचा मस्तवाल पदाधिकारी उघडपणे 'लघुशंका' करीत असल्याच्या चित्राने देशाची जगभरात छीथू झाली. पंतप्रधान मोदी यांनी यावर अद्याप काही भाष्य केले नाही. भोपाळमध्येच एका दलित तरुणास भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःचे तळवे चाटायला लावले. हे प्रकरणदेखील भयंकर आहे. प. बंगालातील ग्रामपंचायत निवडणुकांत हिंसाचार झाला, त्यात 11 जण ठार झाले. हे गंभीरच म्हणावे लागेल, पण मणिपुरात भाजपचे सरकार असून तेथील हिंसाचार दोन महिन्यांपासून थांबायचे नाव घेत नाही. दोनशेच्या आसपास लोक त्या राज्यात मरण पावले. पंतप्रधानांनी अद्यापि मणिपूरच्या हिंसेवर तोंड उघडले नाही. यास काय म्हणावे? पंतप्रधान मोदींच्या काळात खलिस्तानी चळवळीने पुन्हा डोके वर काढले. कॅनडापासून लंडनपर्यंत खलिस्तानी समर्थक आमच्या दूतावासासमोर जमून देशविरोधी नारे देतात, कुठे दूतावासांची तोडफोड करतात व सरकार याबाबत पूर्णपणे मौन बाळगून आहे.", असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.