अहमदनगर : रशिया-युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले आहे. अशात अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेने 40 विद्यार्थी युक्रेनला पाठविले होते. त्यापैकी अहमदनगर शहर व जिल्ह्यातील 18 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. युद्ध परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या एकाच संस्थेमार्फत 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले आहेत, इतरही संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने मागवली आहे.
दरम्यान, युक्रेनमधील सर्व विद्यार्थ्यांशी त्यांच्या पालकांचा आणि संस्थेचा संपर्क सुरू असून, सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे संस्थेचे डॉ. महेश झावरे यांनी ABP माझाशी बोलताना सांगितले आहे. सध्या जरी परिस्थिती ठीक असली तरी युद्ध स्थितीमुळे युक्रेनमधील मॉलमध्ये खाद्यपदार्थही मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची मागणी पालकांकडून होऊ लागली आहे.
सुपर मार्केट बंद होत चालले आहेत : योगीता काळे
युध्द स्थितीमुळे युक्रेनमध्ये लोक चिंतेत आहेत. तेथील सुपर मार्केट बंद होत चालले आहेत. त्यातील किराणाही संपत चालला आहे. येथे वस्तू महाग मिळत आहेत. तसेच एटीएम बाहेर मोठ्या रांगा लागल्यात. भारतीय एटीएम कार्डही बंद पडत चालले आहे अशी प्रतिक्रिया एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या योगिता काळे या विद्यार्थिनीने दिली आहे.
जिथे असाल तिथेच थांबण्याचे भारतीय दुतावासाचा सल्ला
सध्या युक्रेनमध्ये जनजीवन काहीसं विस्कळीत झाले आहे. आमचे पालकही खूप चिंतेत आहेत. भारतीय दुतावासाकडून सांगण्यात आले हे की, आपण जिथे आहात तिथेच रहा, आम्हाला येथून बाहेर काढले जाईल. त्यासाठी आम्हाला युक्रेनच्या पश्चिम भागात नेण्यात येणार आहे. भारतीय दुतावासाने विमानाची सोय करून आम्हाला मायदेशी घेऊन जावे अशी विनंती वेदांती मुळे या पुण्यातील विद्यार्थिनीने केली आहे. सध्या सर्व विद्यार्थी सुखरूप असले तरी घरच्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी घेऊन येण्याची विनंती पालकांकडून होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे कारण काय? जाणून घ्या पाच महत्त्वाचे मुद्दे
- Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी परतले
- Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनागोंदी; शहर सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, मोठी वाहतूक कोंडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha