मुंबई: MSRDC चे सह-संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने त्याच्या मित्रांच्या मदतीने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. अश्वजीत गायकवाड हा विवाहित असल्याचं समोर आल्यानंतर त्या युवतीने जाब विचारल्यानंतर त्याने हे कृत्य केलं. या प्रकरणात सदर युवती ही गंभीर जखमी झाली असून त्याची दखल आता राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Commission for Women) घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून यासंबंधी कारवाई करून अहवाल मागवला आहे.
अश्वजीत गायकवाड या 34 वर्षांच्या तरुणानं त्याच्या प्रेयसीला कारखाली चिरडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे अश्वजीत हा MSRDC चे सह-संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा आहे. प्रिया सिंग असं त्या महिलेचं नाव आहे.
विवाहित असल्याचं बिंग फुटलं
अश्वजीत आणि प्रिया यांच्यामध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पण आपण विवाहित आहोत हे सत्य त्यानं प्रियापासून दडवून ठेवलं होतं. सोमवारी रात्री तिला हे सत्य कळलं. तिनं अश्वजीतला अनेकदा कॉल केला, पण तो फोन घेत नव्हता. अखेर त्यानं फोन उचलला, आणि घोडबंदर रोडवरील ओवळा भागातल्या कोर्टयार्ड हॉटेलजवळ तिला बोलावलं. प्रिया तिथे गेल्यावर त्यांच्यात भांडण झालं आणि रागाच्या भरात अश्वजीतनं त्याचा ड्रायव्हर सागरला प्रियावर गाडी घालायला सांगितलं. सागरनंही त्याचं ऐकलं आणि भलीमोठी रेंज रोव्हर डिफेन्डर गाडी त्यानं तिच्या अंगावर घातली.
त्यानंतर प्रियाला जखमी अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेले. अर्ध्या तासानं रस्त्यावरून जाणाऱ्या एकानं तिला पाहिलं आणि पोलिसांना बोलावलं. त्यानंतर प्रियाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अश्वजीतचे काही मित्र रुग्णालयात जाऊन प्रियाला धमक्या देत असल्याचं समोर आलं. प्रियानं सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्यावर आलेल्या परिस्थितीला वाचा फोडली.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून पालघरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागविला आहे.
ही बातमी वाचा: