नागपूर : बर्ड फ्लू संदर्भातल्या अफवांचा एक वेगळ्या पद्धतीचा परिणाम विदर्भातील सावजी भोजनालयांवर पडला आहे. बर्ड फ्लूच्या भीतीपायी गेल्या काही दिवसांपासून मांसाहार करणाऱ्या खवय्यांनी सावजी भोजनालयांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे नागपुरात शेकडोंच्या संख्येने असलेले सावजी भोजनालय ओस पडू लागले आहे.


चिकन खाणाऱ्या अनेक खवय्यांनी एक तर सावजी जेवणाकडेच पाठ वळवली आहे किंवा चिकन आणि अंड्याऐवजी ऐवजी मटणाच्या डिशेस ला प्राधान्य देत आहेत. नागपूरच्या सर्वात प्रसिद्ध जगदीश सावजी भोजनालयात दर रोज चिकन खपण्याचा प्रमाण 60 ते 70 टक्क्यांनी घटला आहे. जगदीश सावजी मध्ये रोज 20 ते 22 किलो चिकन शिजवला जायचा. मात्र आता ते प्रमाण आता 5 ते 6 किलोंवर आले आहे. अंड्यांच्या बाबतीत ही तसेच घडत आहे.


दुसऱ्या बाजूला चिकनची मागणी कमी होत असताना मटणच्या मागणीत तेवढी वाढ झालेली नाही. त्यामुळे सावजी भोजनालय अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे यंदा नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन झाले नाही. त्यामुळे दर वर्षी डिसेंबर महिन्यात पाहुण्यांमुळे वाढणारी सावजी जेवणाची मागणी यंदा वाढली नाही. तसेच गेल्या काही दिवसात मार्गशीष महिन्यामुळेही मांसाहाराला लगाम लागली होती. मार्गशीष महिना संपल्यानंतर सावजी भोजनालयांना अच्छे दिन येण्याची शक्यता असताना बर्ड फ्लूचा संकट उभा राहिला आहे. त्यामुळे पुन्हा मागणी घटली आहे.


काही वर्षांपूर्वी आलेल्या बर्डफ्लूने तीन महिने मांसाहारावर विपरीत परिणाम टाकल्याची कटू आठवण सावजी भोजनालयवाले आजवर विसरलेले नाही. त्यामुळे यंदा आलेले संकट किती दिवस कायम राहते याबद्दल त्यांच्या मनामध्ये भीतीही आहे. दरम्यान, सावजी जेवणामध्ये चिकन, मटण खूप वेळ शिजवला जातो. उच्च तापमानामध्ये तीव्र मसाल्यांमध्ये शिजवल्यामुळे त्यात कुठला ही विषाणू जिवंत राहू शकत नाही अशी समजूत सावजी भोजनालयवाले घालत आहेत. मात्र, त्याचा फारसा परिणाम सध्या तरी मांसाहार करणाऱ्या खवय्यांवर होत नाही आणि सावजी भोजनालय ओस पडलेले दिसून येत आहे.


संबंधित बातम्या :