बुलडाणा : गोवर-रुबेला लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते अशी अफवा सध्या बुलडाण्यात पसरली आहे. व्हॉट्सअॅपवर असे व्हिडिओ वायरल होत आहेत. ही लस देऊन मुस्लीम समाजाला नपुंसक करण्याचे सरकारचे षडयंत्र आहे. अशा आशयाचा व्हिडिओ जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मुस्लीम लोक या लसीला तीव्र विरोध करत आहेत. त्यामुळे प्रशासनातर्फे याबाबत जनजागृती सुरु झाली आहे.


बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी त्यांच्या मुलीला गोवर-रुबेला ही लस देऊन लसीकरण मोहिमेची सुरुवात केली. जिल्ह्यातल्या शाळांमध्ये लसीकरणदेखील सुरु करण्यात आले. परंतु गोवर-रुबेला लसीबद्दल अफवा परसल्यानंतर आणि व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर मुस्लीम शाळांमध्ये ही लस देण्यास मुस्लीम पालकांनी नकार दिला आहे.

आरोग्य यंत्रणेने सतर्क होत हा आरोप खोडून काढण्यासाठी उच्च शिक्षित मुस्लीमांच्या बैठका घेवून त्यांना लसीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. खोट्या अफवांवर कोणीही मुस्लीम बांधवांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जनजागृती मोहिमांना जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. उर्दू शाळा, मशीदींमध्ये बैठका घेऊन जनजागृतीचे काम सुर आहे.