कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या 34व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे गोंधळ उडाला. कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते सभामंडपातच आमने-सामने येत जोरदार घोषणाबाजी केल्याने एकच गोंधळ उडाला.
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कसबा बावडा इथल्या कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. गेल्या पंधरा दिवसापासून कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरु होतं, त्यामुळे याचे पडसाद राजाराम कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटणार हे निश्चित होतं.
आज सकाळी अकरा वाजता कसबा बावडा इथल्या कारखान्याच्या कार्यस्थळावर सभा सुरु होताच महाडिक समर्थकांनी सभामंडपात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याला प्रत्युत्तर देत आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे एकमेकांविरोधातील ईर्षा शिगेला पोहोचली काही क्षणात सभा सुरु होताच दोन वेळा अशाच पद्धतीचा जोरदार गोंधळ उडाला.
सभागृहात गोंधळ वाढत असल्यामुळे सभा गुंडाळण्यासाठी महाडिक समर्थकांनी मागणी केली. परंतु आमदार अमल महाडिक यांनी सभागृहाला शांत राहण्याची विनंती करत सभा चालू ठेवण्याची विनंती संचालक मंडळाला केली. तब्बल चाळीस मिनिटे चाललेल्या सभेमध्ये महाडिक समर्थकांनी आणि पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांच्या अंगावर धावून जात गोंधळ घातला. यावेळी महादेवराव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ही सभा लोकशाही मार्गाने चालली आहे. बाकी कुठे हुकूमशाही पद्धत आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे, असं महाडिकांनी म्हटलं आहे.
राजाराम कारखान्याच्या सभेत झालेला गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. मागील वर्षी याच सभेत सभासदांमध्ये वाद होऊन एकमेकांच्या अंगावर प्लास्टिक खुर्च्या फेकाफेकी झाली होती. या वर्षीची ही सभा संपल्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊ नये यासाठी पोलिसांनी आमदार सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्या कार्यकर्त्यांना बंदोबस्तात सभागृहाबाहेर काढलं.
सतेज पाटील-महादेव महाडिक गटाचे कार्यकर्ते सभेतच आमनेसामने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2018 04:21 PM (IST)
गेल्या पंधरा दिवसापासून कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरु होतं, त्यामुळे याचे पडसाद राजाराम कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटणार हे निश्चित होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -