Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU) विधिसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. 30 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून 2 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेवर दहा नोंदणीकृत उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत.
पदवी मिळाल्यापासून पाच वर्षे झालेल्या सर्व नोंदणीकृत पदवीधरांची तात्पुरती मतदार यादी विद्यापीठाने जाहीर केली. या पदवीधरांना 'बी फॉर्म' भरण्याची गरज नाही. इच्छुक उमेदवारांना आपले नाव निर्वाचक गणात समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने 'फॉर्म-बी' भरावयाचा आहे. ही प्रक्रिया 25 ऑक्टोबरपासून सुरु झाली असून 2 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिसभेच्या या निवडणुकीसाठी सहा प्रवर्ग तयार करण्यात आले आहेत. यामध्ये, खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग, भटक्या जमाती प्रवर्ग, इतर मागासवर्ग प्रवर्ग, महिला प्रवर्ग असे एकूण 10 उमेदवार निवडले जाणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे हे निवडणूक निर्णय अधिकारी तर उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
45 हजार नवे मतदार नोंदणी
यावेळी 45 हजारांवर नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. मात्र, या मतदारांशिवाय 2005 पासून असलेल्या मतदारांना 'बी'फॉर्म भरणे गरजेचे आहे. यासाठी 20 ऑक्टोबरला विद्यापीठाने परिपत्रक काढले होते. या परिपत्रकानुसार 25 ऑक्टोबरपर्यंत सर्व मतदारांचे 'बी' फॉर्म भरणे गरजेचे होते. मात्र, 2005, 2010 आणि 2017 या तिन्ही वर्षातील मतदार नोंदणी ही किमान 70 हजाराच्या घरात आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात नोंदणी करायची कशी, असा प्रश्न संघटनांद्वारे उपस्थित केला जात आहे.
असे आहे वेळापत्रक
- निर्वाचक गणाची तात्पुरती मतदार यादी - 27 ऑक्टोबर
- अंतिम मतदार यादी प्रसिद्धी - 5 नोव्हेंबर
- नामनिर्देशन कुलसचिवांकडे-10 नोव्हेंबर
- उमेदवारांची यादी प्रसिद्धी -17 नोव्हेंबर
निवडणूक पुढे ढकलण्या विषयी विविध संघटनांचे निवेदन
नागपूर विद्यापीठाने सिनेट निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. परंतु जुन्या मतदारांना बी फार्म भरण्यासाठी फक्त 5 दिवस दिल्याने या अन्यायकारक परिपत्रका विरोधात सिनेट परिवर्तन पॅनल, बाबासाहेब आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशन, भीम आर्मी, बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, प्रहार जनशक्ती, शिक्षक भारती आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु सुभाष चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवडणुका पुढे ढकलणे व बी फार्म भरण्याची मुदत 2 महिने वाढवण्याविषयी निवेदन दिले. निवेदनात ए फॉर्म भरण्यासाठी (नवीन नोंदणी) 3 महिन्याची मुदत व बी फार्म भरण्यासाठी (जुने मतदार) फक्त 5 दिवस या पक्षपाती विरोधाभासावर शिष्टमंडळाने कुलगुरुंसोबत चर्चा केली. प्राप्त परिस्थितीचा विचार करुन आणि विविध संघटनांचे आक्षेप नोंदवून तारीख वाढवण्यासंदर्भात विचार करण्याचे आश्वासन दिले. जर ही तारीख वाढली नाही तर विद्यापीठापुढे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिष्टमंडळाने कुलगुरुंना दिला.
महत्त्वाची बातमी
Currency Notes : नोटांवर महापुरुषांसह मोदींचाही फोटो लावा; भाजप नेते राम कदम यांची मागणी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI