पणजी : गोव्यात प्रादेशिक भाषेच्या आंदोलनासाठी सुभाष वेलिंगकरांना संघाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचं स्पष्टीकरण  आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आलं. संघाचे नवे गोवा प्रांत चालक लक्ष्मण बेहेरे यांनी सुभाष वेलिंगकरांना प्रादेशिक भाषेच्या आंदोलनासाठी संघकार्यातून मुक्त केल्याचं स्पष्ट केलं आहे. संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा राज्यातील शैक्षणिक माध्यमाच्या प्रश्नाला चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप केला आहे.

 

"मनोहर पर्रिकर यांनी सत्तेत येताच शालेय शिक्षणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणे अपेक्षित होते, पण त्यांनी हा प्रश्न योग्य रीतीने हाताळला नाही. मनोहर पर्रीकर हे एक यशस्वी नेते असल्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे," असंही लक्ष्मण बेहेरेंनी फोंड्यात बोलताना म्हटलं आहे .

 

"गोव्यातील शालेय माध्यमाचा मुद्दा महत्वाचा आहे. शालेय शिक्षणाचे माध्यम हे कधीही मातृभाषाच असणे आवश्यक आहे. ही केवळ वेलिंगकरांचीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे, त्यामुळे भाजप सरकारला ती मान्य करावीच लागेल," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

गेल्या तीन दशकांपासून वेलिंगकर संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आहेत. गोव्यातील प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण द्यावं यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या वतीनं जनआंदोलन उभारलं. गोव्यात भाजपविरोधात असताना त्याला भाजपचीही साथ होती. पण सत्ता आल्यानंतर भाजपनं घुमजाव केल्याचा आरोप वेलिंगकरांनी केला होता.

 

तसंच सुभाष वेलिंगकरांशी संघाचे कोणतेही मतभेद नाहीत, पण तात्पुरत्या स्वरुपाची मतभिन्नता आहे.  लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल, अशी भूमिका संघाने घेतली आहे. सुभाष वेलिंगकरांनी विधानसभा निवडणुकीनंतर संघात पुन्हा दाखल होण्याचे संकेत दिले आहेत. तसंच सुभाष वेलिंगकरांच्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनाला संघाने पूर्ण पाठिंबा असल्याचंही स्पष्ट केलं आहे.