Amruta Fadnavis on RSS BJP : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे स्त्रियांचा सन्मान करणारे असून पुरोगामी असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले आहे. स्त्री या विषयी बोलताना टिप्पणी करताना काय बोलले पाहिजे हे विचार करून बोलले पाहिजे असेही त्यांनी म्हटले.  बंडातात्या कराडकर यांनी राजकीय क्षेत्रातील महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी दर्शवली. 


जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार विरोध दर्शवला आहे. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यामागे भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाठराखण केली आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले की, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे स्त्री मान ठेवणारे आहे त्यामुळे विरोधक बंडातात्या यांना आरएसएस पाठबळ आहे हे म्हणणं चुकीच असल्याचे त्यांनी सांगितले. मी भाजप आणि संघाच्या लोकांना ओळखते असेही त्यांनी सांगितले. 


अमृता फडणवीस यांनी म्हटले की, स्त्री या विषयी बोलताना टिप्पणी करताना काय बोलले पाहिजे हे विचार करून  बोलले पाहिजे. वैयक्तिक पातळीवर काहीही बोलायला नको. एखाद्या कंपनीतील भागिदारीमध्ये महिला असतात. मात्र, त्या ठिकाणी होत असलेल्या घोटाळ्याबाबत महिलेला माहिती असते असे नाही, असेही अमृता यांनी म्हटले. 


दरम्यान, वाईनच्या निर्णयावरुन महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोलीस त्यांच्या मठावर दाखल झालेत. फलटणच्या पिंपरद इथल्या बंडातात्या यांच्या मठावर पोलीस दाखल झाले आहेत. बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेण्यात आले असून अटक होण्याची दाट शक्यता आहे. 


आज सकाळी बंडातात्या यांच्या फलटण येथील मठावर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी बंडातात्यांसोबत चर्चा केली. दारु आणि महिला नेत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलीस बंडातात्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना पिंपरद  येथून फलटण येथे नेले आहे.