परभणी : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी करोडो रुपये जप्त करण्यात आले. मात्र परभणीत निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल 64 लाख रुपये पोलिस तपासणीत सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या पैशांचा परभणी विधानसभा निवडणुकीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याच दिशेने तपास सुरु करण्यात आला आहे.


विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर परभणी पोलिसांकडून दिवाळीच्या अनुषंगाने शहराबाहेर रात्रीच्या वेळी नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी सुरु करण्यात आली. नानल पेठ पोलिसांच्या वतीने सुरु असलेल्या परभणीच्या जिंतुर नाक्यावरील नाकाबंदीत एक चारचाकी गाडी शहरात येत असताना चौकीवर तिची तपासणी करण्यात आली. गाडीत एकूण 64 लाख 6 हजार 900 रुपये आढळले.

गाडीत असणाऱ्या मो सलीम मो युसूफ अन्सारी, मो कलीम मो युसूफ अन्सारी, जियाउद्दीन सय्यद निजामुद्दीन, मो इरफान मो अयुब आणि गाडी चालक विठ्ठल नंद या 5 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची चौकशी केली असता त्यांना या पैशाबाबत उत्तर देता आले नाही. नानल पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे यांनी या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान परभणी शहरात येणाऱ्या या पैशांचा परभणी विधानसभा निवडणुकीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून त्याच दृष्टीने पोलीस सविस्तर तपास करत असून लवकरच ते स्पष्ट होईल,अशी प्रतिक्रिया नानल पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.