Rohit Pawar on PM Modi: चालू वर्षात तब्बल 5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाल्यानंतर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत सातत्याने कमकुवत होत आहे. 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपया पुन्हा घसरून ₹90.43 या अतिशय खालच्या स्तरावर पोहोचला. कालच्या दिवशी रुपया ₹90.15 वर बंद झाला होता. रुपयातील ही अभूतपूर्व घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकेत देणारी ठरत आहे. यामुळे आयात खर्च, इंधन बिले, तसेच उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. परिणामतः ग्राहक वस्तूंच्या किमतींमध्येही वाढ अपरिहार्य ठरणार आहे.
मोदींचा 2014 पूर्वीचा व्हिडिओ व्हायरल (PM Modi Viral Video)
दरम्यान, रुपया गेल्या 10 वर्षापासून सातत्याने धारातीर्थी पडत असतानाच मोदींचा 2014 पूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मोदी यांनी मी सरकारमध्ये आहे, मला माहीत आहे, अशा पद्धतीने रुपया घसरुच शकत नाही असे म्हणत तत्कालिन मनमोहन सिंग सरकारला देश आपल्याकडून उत्तर मागत असल्याचे म्हटले होते. आता हाच व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत खोचक टोला लगावला आहे.
मोदी साहेबांचं भाषण आजही तंतोतंत लागू पडतंय (Rohit Pawar on PM Modi)
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने नव्वदी ओलांडली असून शतकी खेळी करण्याकडं वाटचाल सुरुय.. अशा परिस्थितीत मा. नरेंद्र मोदी साहेबांचं २०१४ पूर्वीचं हे भाषण आजही तंतोतंत लागू पडतंय. त्यावेळी ते तत्कालीन केंद्र सरकारला विचारत होते ‘‘जवाब देना पडेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा हैं!’’ आजही देश केंद्र सरकारला हेच विचारतोय..!
दरम्यान, सततच्या परकीय गुंतवणुकीच्या बाहेर जाण्यामुळे रुपयावर दबाव वाढतच चालला आहे. 2025 मध्ये 1 जानेवारी रोजी रुपया ₹85.70 प्रति डॉलर होता; आता तो घसरत जाऊन ₹90.43 पर्यंत आला आहे. म्हणजेच 5.5% पेक्षा जास्त अवमूल्यन झाले आहे.
रुपया घसरल्याने वाढणारा आर्थिक भार (Rupee Hits Low)
रुपया कमकुवत झाला की भारतासाठी आयात स्वयमेव महाग होते. विशेषत: कच्चे तेल, सोने आणि औद्योगिक घटक. याचबरोबर परदेशात प्रवास करणे आणि शिक्षण घेणेही महाग झाले आहे.
उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी 1 डॉलर = ₹50 असताना अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी खर्च येत असे. पण आता 1 डॉलर = ₹90 पेक्षा जास्त असल्याने शिक्षण शुल्क, निवास, अन्न, वाहतूक अशा सर्व खर्चांमध्ये मोठी वाढ जाणवत आहे.
रुपया घसरण्याची प्रमुख कारणे (Rupee Fall)
1) अमेरिकेच्या व्यापारधोरणांचा परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर 50% कर लादला आहे. या वाढीव टॅरिफचा भारताच्या GDP वृद्धीवर 60–80 बेसिस पॉइंट्स इतका नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
निर्यात कमी होणे आणि परकीय चलनाचा प्रवाह कमी होणे. या दोन्ही कारणांमुळे रुपया दबावाखाली आहे.
2) परदेशी गुंतवणुकीची मोठी माघार (FII Outflow)
जुलै 2025 पासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) यांनी ₹1.03 लाख कोटींहून अधिक भारतीय मालमत्ता विकल्या आहेत. अमेरिकेतील शुल्कवाढ आणि व्यापारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी भारतातून निधी काढून घेतला, ज्यामुळे डॉलरची मागणी वाढली आणि रुपया आणखी घसरला.
3) आयातदारांकडून डॉलरची मोठी खरेदी
तेल कंपन्या, सोने आयातदार आणि धातू क्षेत्रातील कंपन्या हेजिंगसाठी मोठ्या प्रमाणात डॉलर खरेदी करत आहेत. टॅरिफ अनिश्चिततेमुळे डॉलरचा साठा करण्याची प्रवृत्ती वाढली आहे, त्यामुळेही रुपयावर प्रचंड दबाव आहे.