मुंबई : ईडीकडून (ED) राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना समन्स बजावण्यात आलं आहे. त्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आलीये. त्यांनी यावेळी ईडीला विनंती केलीये. त्यांनी म्हटलं की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 24 ऐवजी 22 किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं. तशी माझी तयारी आहे.
रोहित पवारांनी ट्वीट करत यासंदर्भात ईडीला विनंती केलीये. तसेच रोहित पवारांनी सर्वांचे आभार देखील मानले आहेत. शुक्रवार 19 जानेवारी रोजी रोहित पवारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं. तसेच 24 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे रोहित पवार यांनी आता या चौकशीला हजर राहण्याची तयारी दर्शवण्यात आलीये. पण आता ईडी रोहित पवारांची ही विनंती मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलं?
ईडीच्या बातमीमुळे राज्यातून अनेकांनी फोन/मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात. म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील. म्हणूनच ईडीला विनंती केलीये की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर 24 तारखेऐवजी 22 तारखेला किंवा 23 तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, माझी ही विनंती मान्य केली जाईल.
पक्ष आणि घरे फोडण्यासाठी यंत्रणांचा वापर - सुप्रिया सुळे
दरम्यान रोहित पवारांना आलेल्या या समन्सवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलीये. त्यांनी म्हटलं की, यामध्ये मला काहीही आश्चर्य वाटत नाही. 95 टक्के विरोधकांना ईडी ,सीबीआय आणि इन्कम टॅक्स लावलेत. पक्ष आणि घरं फोडण्यासाठी यंत्रणांचा वापर केला जातो. यामध्ये यंत्रणांची चूक नाही. मुख्यमंत्री म्हणातात राज्य अदृश्य शक्ती चालवतं, ही अदृश्य शक्ती महाराष्ट्रातील माणसाच्या विरोधात कटकारस्थानं करीत आहे.
त्याबाबत मला कल्पना नाही - अजित पवार
याबाबत मला माहित नाही. ईडी ही केंद्रीय यंत्रणा आहे. मागे मलाही नोटीसा आल्यात. त्यात तथ्य असेल तर अडचणी येतात, नसेल तर काही अडचण येत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीये.
हेही वाचा :
Rohit Pawar : रोहित पवार यांना ईडीची नोटीस, 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश