मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे सर्वात मोठी राजकीय स्पर्धक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून निवडणुकीचा रिंगणात उभे आहेत, तर शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं आहे.

आदित्य आणि रोहित या दोघांनी आज त्यांच्या उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी दोघांनीही त्यांच्याकडील स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला. आदित्य आणि रोहित यांच्या प्रतिज्ञापत्रांवरील संपत्तीचा तपशील पाहिल्यानंतर रोहित पवार हे आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत असल्याचे समोर आले आहे.

आदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आहे. आदित्य ठाकरेंनी ते पेशाने व्यावसायिक असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. यामध्ये 10 कोटी 36 लाखांच्या बँक ठेवी आहेत. 20 लाख 39 हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स आहेत. साडेसहा लाखांची एक बीएमडब्लू बाईक आहे. 64 लाख 65 हजारांच्या सोन्याचा यामध्ये समावेश आहे. तर 10 लाख 22 हजार अशी एकूण 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावावर आहे.

रोहित पवारांच्या नावे 18 कोटी 40 लाख लाखांची संपत्ती आहे. त्यामध्ये 3 लाख 76 हजार रुपये रोकड, बँक खात्यात 2 कोटी 75 लाख 31 हजार रुपये, 9 कोटी 65 लाख रुपयांची बॉन्ड, शेअर्स, म्यूचुअल फंड्समध्ये गुंतवणूक, 11 लाख 21 हजाराचं सोनं, (पत्नी कुंतीकडे 67 लाखाचं सोनं) 47 हजाराची चांदी, 1 लाख 68 हजाराचे हिरे, 4 लाख 52 हजार इतर दागिने, 28 लाखांची महागडी घड्याळं, 5 कोटी रुपयांची शेतजमीन, घर, फ्लॅट (आत्ताच्या बाजारभावानुसार किंमत 24 कोटी रुपये ). 12 लाख रुपयांच्या दुचाकी, तीन कोटी 46 लाख रुपयांची वडिलोपार्जीत मालमत्ता. 3 कोटी 74 लाख रुपयांच बँकेचं कर्ज. एकूण 18 कोटी 40 लाख 45 हजार रुपयांची संपत्ती रोहित पवारांकडे आहे. तर रोहित यांच्या पत्नीकडे 7 कोटी 28 लाख 18 हजार रुपयांची संपत्ती आहे. दरम्यान, यावर्षीच्या आयकर विवरणपत्रात रोहित यांनी 3 कोटी 67 लाख 54 हजार रुपये इतके उत्पन्न दाखवले होते.

व्हिडीओ पाहा


भाजपचे मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार


आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपचे मलबार हिलचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. मंगलप्रभात लोढा यांनी एकूण 441 कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. या संपत्तीशिवाय त्यांच्यावर 283 कोटींचं कर्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.


उदयनराजेंपेक्षा अबू आझमी श्रीमंत


समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांनी स्वत: आणि पत्नीकडे एकूण 209 कोटी 8 लाख चल-अचल संपत्ती असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तर सातारा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या 157 कोटी 22 लाख तर पत्नी दमयंती यांच्याकडे 4 कोटी 14 लाखांची संपत्ती आहे. अशारीतीने एकूण 161 कोटी 36 लाख 75 हजार रुपयांची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. उदयनराजेंकडे 25 लाख आणि त्यांच्या पत्नीकडे 1 लाख 95 हजार रोख रक्कम आहे.


एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे एकूण 22.98 कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेचे जालन्यातील उमेदवार अर्जुन खोतकर यांच्याकडे 7.67 कोटींची तर मुलगा अभिमन्यूकडे 2.24 लाख रुपयांची संपत्ती आहे.