पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त "व्हॉइस ऑफ देवेंद्र" (Voice of Devendra) ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, पुणे विद्यापीठातील एनएसएस विभागाच्या प्राचार्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे पत्र पाठविण्यात आल्याने, तसेच पुणे विद्यापीठानेच ही स्पर्धा भरवल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी पुणे विद्यापीठातील प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, आता स्पर्धेच्या आयोजकांनी रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. स्वारंभ फॉउंडेशन, नाशिक प्रतिष्ठान व आय-फेलोज फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने (Pune university) आयोजित केली नसून रोहित पवार खोटारडा माणूस आहे, असेही स्पर्धेच्या आयोजकांनी म्हटले आहे. दरम्यान, रोहित पवारांनी देखील पुन्हा ट्विट करुन विद्यापीठाचा दुटप्पीपणा असल्याचे म्हटले आहे.
'व्हाईस ऑफ देवेंद्र' या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. आता, रोहित पवार यांच्या टीकेला आयोजकांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. 'व्हाईस ॲाफ देवेंद्र' स्पर्धेबाबत आयोजकांकडून माहिती देण्यात आली असून ही स्पर्धा पुणे विद्यापीठाने आयोजित केली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रोहित पवार अत्यंत खोटारडा माणूस आहे, ट्विट करुन ते खोटी माहिती महाराष्ट्राला देत आहेत. ही स्पर्धा पुणे विद्यापीठानी भरवलेली नाही. तर, विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत व्हॉईस ऑफ देवेंद्र यांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा भरविण्यात आल्याचं या स्पर्धेचे समन्वयक वैभव सोलनकर यांनी म्हटलं आहे. तसेच, शरदचंद्र पवार यांच्या नावाने तुम्ही विद्या प्रतिष्ठान, शारदा प्रतिष्ठान आणि रयत शिक्षण संस्थेत स्पर्धा आयोजित करता, तेव्हा तुम्हाला हे दिसत नाही, असा सवालही सोलनकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, रोहित पवारांनी आणखी एक ट्विट करत, पुणे विद्यापीठाचा हा दुटप्पीपणा असल्याचं म्हटलं आहे.
पत्र मागे घेण्याची उपरती
‘व्हाइस ऑफ देवेंद्र’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपलं पत्र मागं घेण्याची उपरती झाली. पण ‘एकीकडं व्हाइस ऑफ देवेंद्र’ राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजन केलं नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडं राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत काढलेलं पत्र मागे घ्यायचं, हा विद्यापीठाचा दुटप्पीपणा आहे. अशी डबल ढोलकी वाजवून छुप्या पद्धतीने आपला राजकीय अजेंडा राबवणं, योग्य नाही, असे रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. तसेच, शिक्षणाचं मंदिर असलेल्या विद्यापीठांच्या माध्यमातून राजकीय अजेंडे राबवण्याचा विषय हा केवळ या स्पर्धेपुरता मर्यादित नाही तर असे अनेक विषय आहेत, महिन्याअखेरपर्यंत विद्यापीठातील या राजकीय अजेंड्यांच्या संदर्भातील सर्व विषयांची पोलखोल करू, असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार
विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचे नसते याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसत असल्याचे रोहित पवार म्हणाले. निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणे काम करत असल्याचे संपूर्ण देश बघत आहे. आता शिक्षणाची मंदिरे असलेली विद्यापीठे देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच Voice of Democracy मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील असे रोहित पवार म्हणाले.