मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजपच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात ट्वीटर वॉर पाहायला मिळत असतानाच, त्यांच्या वादात आता राष्ट्रवादीच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंची (Rohini Khadse) एन्ट्री पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर खडसे यांनी निशाणा साधला आहे. सोबतच भाजपमधील काही नेत्यांवर कसा अन्याय केला जातो याचा पाढाच वाचून दाखवला आहे.
रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या?
"अहो चित्राताई, भारतीय जनता पक्षात महिलांना मान सन्मान दिला जातो हे तुम्हाला कुणी सांगीतलं बरं? आम्ही अनेक वर्षे तिथे होतो, आम्हाला महित आहे काय आहे. बरं ठिक, तुमचे म्हणणे बरोबर आहे, असे म्हटले तर मग, आदरणीय पंकजाताईवर अन्याय कशासाठी सुरु आहे हो?, जरा विचारा ना तुमच्या नेत्यांना. केवळ त्याच नाही तर ज्यांनी पक्ष वाढविला, तळागाळात पोहचविला त्या प्रमोदजी महाजन यांच्या कन्या खासदार पुनमताई महाजन सध्या कुठेच दिसत नाहीत. पुण्यातल्या मेधाताई कुळकर्णींचे काय? त्यांची जागा चंद्रकांतदादांनी हिसकावली, नंतर त्यांच्या हातावर अक्षदा देण्यात आल्या हा त्यांचेवर अन्याय नाही का? बरं राज्यापुरतेच हे मार्यादित नाही बरं का, चित्रताई... अगदी दिल्लीत देखील दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचेवरही अन्यायच झाला आहे. तुम्हाला माहितीच घ्यायची ना? तर वसंधुराराजेंना विचारा अन्याय काय असतो ते.. अगदीच झालं तर आदरणीय सुमित्राताई महाजन यांनाही विचारा की, पक्षात अन्याय कसा असतो ते.... राहीले राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर इथे जर महिलांवर अन्याय होत असता तर ‘तुम्हाला राज्याचे प्रमुख पद तरी दिले असते का हो?’ उगाच टिका करायची म्हणून काहीही करु नका ताई. अशानं हसे होते बरं का....
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
राज्याच्या मोठ्ठ्या ताई…सुप्रियाताईंना 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणार नाहीच. महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही. कारण ससून प्रकरणात 9 पोलिस निलंबित झाले, पण तुम्हाला ते आवडले नसेल. हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या, पण तेही तुम्हाला आवडले नसेल कारण... कारण, तुम्हाला फक्त 100 कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री.. तुम्हाला हवे काय? ...आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय? की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना सेवेत घेणारा गृहमंत्री? तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र करणार तरी काय महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई?, असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या: