सोलापूर : कर्नाटकातील यशवंतपूरमधून अहमदाबादकडे जाणाऱ्या फेस्टिवल एक्सप्रेसवर सोमवारी पहाटे दरोडा टाकण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वेच्या सिग्नलची वायर तोडून गाडी थांबवत हा दरोडा टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी-नागणसूर स्थानकादरम्यान आली. अचानक रेल्वे थांबल्याने प्रवाशांना काही कळायला तयार नव्हते. सिग्नल लागल्याने गाडी थांबल्याची माहिती कळेपर्यंत अचानक गाडीवर दगडांचा वर्षाव सुरु झाला.


त्यांनतर काही दरोडेखोरोंनी रेल्वेत प्रवेश करुन महिलांच्या गळ्यातील सोने-चांदीचे दागिने हिसकवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत काही जणांना इजा देखील झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली. या दरोडेखोरांनी भिरकावलेल्या दगडांमुळे काही प्रवाशांना गंभीर जखम देखील झाली. प्रवाशांना मारहाण करत त्यांच्या जवळील दागिन्यांसह पैसे, मोबाईल, घड्याळ असा जवळपास तीन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरण्यात आल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. मात्र काही प्रवासी फिर्याद देण्यास पुढे न आल्याने आणखी चोरी झालेल्या साहित्याची संपूर्ण माहिती मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर जवळपास 50 तोळे सोने लंपास झाल्याचा दावा एका महिला प्रवाशाने केला आहे.


या घटनेमुळे तब्बल चार यशवंतपूर-अहमदाबाद एक्सप्रेस सोलापूर रेल्वे विभागात थांबवण्यात आली होती. जवळपास 15 ते 20 मिनीट चाललेल्या या थरारानंतर चोरटे पळून गेले. भयभीत झालेल्या प्रवाशांची समजूत काढून गाडी 5.30 वाजता बोरोटी स्थानकावरुन सोलापूरकडे रवाना झाली. सोलापूर स्थानकावर गाडी पोहोचताच या घटनेची आधीच माहिती मिळाल्याने जखमी प्रवाशांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी टीम तैनात करण्यात आली होती. जखमी प्रवाशांवर उपचार करुन प्रवाशांची तक्रार नोंदवण्यात आली. सकाळी 7 च्या सुमारास ही रेल्वे सोलापूरहून अहमदाबादकडे मार्गस्थ झाली.


या प्रकरणी सोनाली प्रफुल्ल सुरपुरिया रा. अहमदनगर यांनी सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर या घटनेत कविता बसनेट (वय 45), खेमा राम (वय 65), गजेंद्र सोनार (वय 52) हे तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. संध्याकाळपर्यंत श्वान पथकाद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. या सोबत चोरीला गेलेल्या मोबाईलची लोकेशन ट्रेस करुन त्याद्वारे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न देखील लोहमार्ग पोलिस करत होते. घटनेची गंभीर दखल घेऊन तपासासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा देखील शोध घेण्याचे काम सुरु असल्याची प्रतिक्रिया सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी दिली.