सातारा : सातारा जिल्ह्यातील उंब्रज भागात दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दरोडेखोरांनी दुकानं, घरं फोडत लोकांना मारहाणही केली. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला आहे. जेनून करीम मुल्ला असे मृत महिलेचं नाव आहे. कुऱ्हाडींसह इतर शस्त्रांसह आलेल्या दरोडेखोरांनी बाजारपेठेतील दुकानं फोडली, घरांचे बंद दरवाजे तोडले. उंब्रजमधील संपूर्ण परिसरात या दरोडेखोरांची सध्या दहशत पाहायला मिळते आहे. लोक हादरुन गेले आहेत. पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी किती मुद्देमाल चोरला, हे अद्याप नेमकं कळू शकलेलं नाही.