उस्मानाबाद : तुमचं आमचं रक्षण करणारे पोलीसच असुरक्षित असल्याचं बुलढाणा आणि उस्मानाबादमधल्या घटनांनंतर म्हणण्याची वेळ आली आहे. डीजेला विरोध केला म्हणून थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला करण्यात आल्याची घटना बुलढण्यात घडलीय तर उस्मानाबादमध्ये अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गावगुंडांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस समाधान नवले यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर बबन जाधव हे देखील गंभीर जखमी झालेत.
कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचंही समजत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अवैध कत्तलखाना नगरसेवक खलिफ कुरेशी यांचा असल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी नगरसेवर खलिफा कुरेशी, त्याचा भाऊ कलीम कुरेशी यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार इथल्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काही तक्रारदारांनी येऊन खिरणीमळा भागामध्ये अवैध पद्धतीने कत्तलखाने सुरु असल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांची परवानगी घेऊन पथक 10.45 च्या वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झालं.
काल मध्यरात्रीच्या सुमारास शेगाव शहर पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास एका ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात डीजे पार्टी सुरू असल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाढदिवसाच्या पार्टीत सुरू असलेला डीजे बंद झाला. यानंतर काही वेळेनंतर काही अज्ञातांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. जवळपास 30 जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर धावून आला. या जमावाने पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड केली. पोलिसांनी या घटनेबाबत भाष्य करण्यास, माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी आठ ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.