हिंगोली : हिंगोलीतील वसमत तालुक्यात पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या द परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा पडला. चोरटयांनी तब्बल 19 लॉकर फोडले असून मोठा मुद्देमाल चोरीला गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, बँकेतील पाच लॉकर धारकांनी 60 तोळ्याहून अधिक सोनं चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. 19 पैकी पाच लॉकरमधून 60 तोळं सोनं चोरीला गेलं, मग इतर लॉकरमध्ये किती सोनं होणं, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



वसमत शहरात आंबेडकर मार्केट इथे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. रविवार 9 एप्रिलला सुट्टी असल्याचं हेरत चोरट्यांनी रात्री अडीच ते साडे तीनच्या सुमारास बँकेच्या शटरचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. याशिवाय चोरट्यांनी डीव्हीआर मशिन, दोन राऊटरही लांबवल्याची तक्रार शाखाधिकारी अशोक एकनाथ साबणे यांनी पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी वसमत पोलिस ठाण्यात कलम 457, 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बँकेत एकूण 75 लॉकर असून त्यापैकी 19 लॉकर चोरटयांनी फोडले. या 19 पैकी 8 लॉकर हे एका ग्राहकाचे होते तर उर्वरित लॉकर रिकामेच होते. या लॉकरच्या बाजूला बँकेची तिजोरी होती, त्यामध्ये 4 लाख 60 हजार रुपये होते. मात्र ती तिजोरी चोरटयांनी फोडली नाही, असं बँकेच्या  व्यवस्थापकाने सांगितलं.



सोमवारी सकाळी 9.30 वाजता बँक उघडताना शटरचे  कुलूप तुटल्याचं लक्षात आलं. त्यानंतर बँकेवर दरोडा पडल्याचं मॅनेजरच्या लक्षात आलं आणि त्याची माहिती पोलिसांना दिली.