Restaurants Food : सध्या इंधनाच्या किंमती गगनाला भिडत आहेत. इंधनाच्या किंमती वाढत असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. अशातच गॅसच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवण देखील महागणार आहे. वाढत्या गॅस दरामुळे औरंगाबादेत हॉटेल्स असोसिएशननं 20 टक्के दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 


व्यवसायिक वापराच्या गॅस दारात मोठा वाढ झाल्याने हॉटेल चालकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे गॅस खरेदीसाटी अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे आता हॉटेलमधील जेवण देखील महागणार आहे. औरंगाबादमधील हॉटेल्स असोसिएशनने 20 टक्के दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढत्या महागाईत काळात सध्याच्या रेटमध्ये जेवण पुरवणे शक्य होणार नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे.


दरम्यान, या आठवड्यात हॉटेल व्यावसायिक यांची बैठक होणार आहे. त्यानंतर हे दर लागू होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत सिलेंडरचे दर 1 हजारांनी वाढले आहेत. सोबत धान्य पालेभाज्या सगळच महागले आहे. त्यामुळं ही महागाई आता खूप झाली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळं आता दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं औरंगाबाद हॉटेल व्यावसायिक संघटनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.



आज गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ 


देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1020 रुपये असणार आहे. आधी ही किंमत प्रति सिलेंडर 970.50 रुपये इतकी होती. आजपासून एलपीजी सिलेंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असतानाच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. याआधी 22 मार्च रोजी घरगुती घरगुती सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली होती. आता पुन्हा एकदा महागाईने जनतेला मोठा झटका दिला आहे. किंमत वाढल्यामुळे घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत एक हजार रुपयांच्या पार पोहोचली आहे.