रत्नागिरी : कोकणचे मंत्री आणि आमदार, खासदार केवळ नावापुरेच आहेत. त्यांचा काहीही उपयोग नाही. अशाच प्रकारची प्रतिक्रिया मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जनमाणसामध्ये पाहायाला मिळत होती. समाजमाध्यमांवर देखील अशा चर्चांना ऊत आला होता. त्याला कारण होते ते कोरोना. कारण रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत होते. पण, यावेळी जिल्ह्यात स्वॅब तपासणीकरता प्रयोगशाळा नव्हती. त्याकरता पूर्णत: मिरजवर अवलंबून राहावे लागत होते. शिवाय, जवळपास 200 किमी पेक्षा देखील जास्त अंतर असल्याने वेळ देखील खर्ची होत होता. अशावेळी मिरज येथून मोठ्या प्रमाणावर स्वॅब तपासणीकरता असमर्थता दर्शवली गेली. परिणामी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेपुढे मोठा पेच उभा राहिला. त्यानंतर स्थानिक लोक प्रतिनिधींवर टीकेची झोड उठली.


मात्र आता उशीरा का होईना जिल्ह्यात कोरोना लॅब उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात लॅबला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता जिल्हा रूग्णालयात पुढील 15 दिवसांमध्ये कोरोना स्वॅब तपासणी लॅब उभारली जाणार आहे. याकरता 1 कोटी 7 लाखांचा खर्चाचा कोविड फंड अंतंर्गत मंजुरी देखील देण्यात आली आहे. रविवारपासून या लॅब उभारणीला सुरुवात झाली आहे.


लॅबवरून रंगले राजकारण


ज्या कोकणने शिवसेनेला पाठिंबा दिला. त्या कोकणला स्वॅब तपासणीला अवलंबून राहावे लागणे ही बाब दुर्दैवी आहे, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत होती. पण, यावर पत्रव्यवहार सुरू असून लवकरच त्याबाबतची मंजुरी मिळेल असे आश्वासन स्थानिक आमदार उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडू मिळत होते. शिवाय, या लॅब संदर्भात न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. या साऱ्या घडामोडी असल्या तरी त्याचे फलित म्हणजे रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात आता कोरोना स्वॅब तपासणी लॅब उभारली जाणार आहे. पुढील 15 दिवसात हे काम पूर्णत्वाला जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


जिल्ह्यात काय आहे कोरोनाची स्थिती?


जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आजरोजी जिल्ह्यात 70 हजार नागरिकांना क्वॉरंटाईन करून ठेवलेले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 156 वर पोहोचला असून आतापर्यंत 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर, 45 पेक्षा देखील अधिक रूग्णांना कोरोनावर यशस्वी मात केली आहे.